बुधवार पेठेची ओळख कोल्हापूरचा इतिहास उलगडेल : श्रीमंत शाहू महाराज
schedule14 Sep 23 person by visibility 435 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जुना बुधवार पेठेतील सर्वसामान्य लोकांनी साहित्य, कला, क्रीडा, ते शिक्षण या क्षेत्रात ठसा उमटवला आहे. पेठेचा इतिहास हा जनतेचा इतिहास आहे. बुधवार पेठेचा इतिहास पुस्तक रूपातून प्रसिद्ध झालेला हा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमाचा प्रसार कोल्हापुरातील सर्व भागात व्हावा, अशी इच्छा श्रीमंत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केली. 'ओळख जुना बुधवार पेठेची' या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी आमदार जयश्री जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, माजी महापौर महादेव आडगुळे ,पुस्तकाचे संपादक प्रा. दिनेश डांगे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात शाहू महाराज म्हणाले, २२०० वर्षांपूर्वी कोल्हापूरची प्राचीन वस्ती ब्रह्मपुरी टेकडीवर होती. याच परिसरात कोल्हापुरातील सर्वात जुनी पेठ जुना बुधवार पेठ उदयास आली. या पेठेत स्वातंत्र्यसैनिक, शिक्षण महर्षी कलाकार खेळाडू उदयास आले .या दिग्गज मंडळींच्या कार्यातून पेठेची जडणघडण झाली. या महान व्यक्तिमत्त्वांचा इतिहास पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला असून त्यातून सर्वसामान्य स्फूर्ती मिळेल.
पेठेच्या इतिहासाचे पुस्तक निर्माण होते याचे आश्चर्य वाटले असे सांगून कुलगुरू शिर्के यांनी महाविद्यालयीन शिक्षण जुना बुधवार पेठेतील जुन्या विवेकानंद कॉलेजमध्ये झाले आहे. त्यामुळे माझाही ऋणानुबंध या पेठेशी जोडला गेला आहे असे ते म्हणाले. पेठेतील सिद्धार्थ नगरातील दादासाहेब शिर्के यांनी कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ निर्माण व्हावे हा पहिला ठराव केला होता याची माहिती मला प्रथमच मिळाली. जुना बुधवार पेठेतील अनेक लोकांनी शिवाजी विद्यापीठात नोकरी करताना प्रामाणिकपणे सेवा बजावून विद्यापीठाला वैभव प्राप्त करून दिले आहे. पेठेचा वसा आणि वारसा भावी पिढीपुढे गेला पाहिजे. या पुस्तकाची पेठेमध्ये घरोघरी पारायणे झाले पाहिजेत असे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्राचार्य अभय कुमार साळुंखे म्हणाले, माजी नगराध्यक्ष दादासाहेब हळदकर यांनी पहिल्यांदा भुसारी वाडा येथे शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांना शाळा काढण्यास परवानगी दिली .या शाळेत बहुजन समाजाची मुले शिकली. याच पेठेत विवेकानंद कॉलेज सुरू झाले. प्राचार्य रा.कॄ. कंणबरकर यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे बारावीच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांनी यश मिळवले. जुना बुधवार पेठेत लावलेल्या विवेकानंद शिक्षण संस्थेचे रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे.
'जुना बुधवार पेठेच्या इतिहासाची पुस्तकामुळे नवीन पिढीला ऊर्जा मिळेल' अशी भावना माजी आमदार सुरेश साळोखे यांनी व्यक्त केली.
पेठेची माहिती देऊन पेठेतील लोकांच्या विषयी आदरभाव वाढवण्याचे काम या पुस्तकांनी केले आहे असे प्रतिपादन आमदार जयश्री जाधव यांनी केले. इतिहासरूपी पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांनी दिनेश डांगे यांच्यासह संपादक मंडळाला आमदार जयश्री जाधव यांनी धन्यवाद दिले. माजी महापौर महादेव आडगुळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. पुस्तकाचे लेखक व संपादक प्राध्यापक दिनेश डांगे यांनी पुस्तकातील अनेक माहितीचे खुमासदार शैलीत विवेचन केले. बांधकाम व्यवसाय उत्तम फराकटे यांनी पेठेच्यावतीने मनोगत व्यक्त केले. तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी आभार मानले. पुस्तक प्रकाशनापूर्वी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या कार्यक्रमाला माजी महापौर सरिता मोरे, माजी नगरसेविका तेजस्विनी घोरपडे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, पैलवान बाबा महाडिक उपस्थित होते.