गोकुळचा सौर ऊर्जा प्रकल्प पर्यावरण संरक्षणासह स्वच्छ ऊर्जा अभियानाचे आदर्शवत मॉडेल - मंत्री हसन मुश्रीफ
schedule16 Mar 25 person by visibility 417 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘गोकुळमार्फत उभारलेला ६.५ मेगा वॅट सोलर प्रकल्प केवळ एक ऊर्जा प्रकल्प नसून पर्यावरण संरक्षण आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा अभियानाचा एक महत्वाचा भाग व आदर्शव मॉडेल आहे. हे काम देशात पहिल्यांदाच गोकुळसारख्या एका सहकारी संस्थेने केले आहे. गोकुळचे काम आदर्शवत असून इतर संस्थांना अनुकरणीय आहे.’ असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षकणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ६२ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी येथे गोकुळने उभारलेल्या ६.५ मेगा वॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रविवारी (१६ मार्च २०२५) झाला. मंत्री मुश्रीफ व करमाळयाचे आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते आणि गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन कार्यक्रम झाला. गोकुळने १८ एकर जागेवर हा प्रकल्प उभारलेला आहे.
करमाळाचे आमदार नारायण पाटील म्हणाले,‘ गोकुळने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजना आणि सोयी सुविधांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. गोकुळसारख्या मोठ्या संस्थेने आमच्या लिंबेवाडी करमाळा येथे प्रकल्प उभारला आहे. त्यासाठी त्यांना नेहमीच आमचे सहकार्य राहील.’
चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले,‘सध्या गोकुळ मुख्यालयाकडील वर्षाकाठी जवळजवळ वीज बिलाचा खर्च १६ कोटी इतका येतो. हा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे ठरविले. गोकुळने १८ एकर जागा खरेदी करून या जागेमध्ये ६.५ मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला. या प्रकल्पाचा जागेसह खर्च ३३ कोटी ३३ लाख रुपये इतका झाला आहे. प्रकल्पामुळे गोकुळ मुख्यालयाकडील वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे रुपये ६ कोटी इतकी बचत होणार आहे.’
मे. सर्जन रिॲलिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी राजेश बांदल यांनी प्रकल्पाची माहिती दिली. गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी स्वागत केले. संचालक अजित नरके यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एम. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, नविद मुश्रीफ, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंहपाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, व्यवस्थापक अभियांत्रिकी प्रताप पडवळ, सहायक व्यवस्थापक इलेक्ट्रिकल ए. आर. कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, सतीश व्यवहारे उपस्थित होते.