भाजपची पहिली यादी जाहीर, चंद्रकांत पाटील, अमल महाडिक, राहुल आवाडे यांना उमेदवारी
schedule20 Oct 24 person by visibility 1059 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यात पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पहिली यादी रविवारी जाहीर केली. भाजपाने तब्बल ९९ उमेदवारांची यादी घोषित केली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण आदींचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अमल महाडिक व इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांना उमेदवारी दिली आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी कोथरुडमधून जाहीर झाली आहे. सातारा येथून शिवेंद्रसिंह भोसले यांची उमेदवारी आहे. तर सांगलीतून आमदार सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी तर कणकवली येथून नितेश राणे लढत आहेत.मिरजमधून मंत्री सुरेश खाडे यांची उमेदवारी आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी उमेदवारांची घोषणा केली आहे.
कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक यांनी यापूर्वी २०१४ ते २०१९ या कालावधीत विधानसभेवर प्रतिनिधीत्व केल आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी महायुतीच्या माध्यमातून विविध विकासकामासाठी पाठपुरावा केला. निधी उपलब्ध केला आहे. तर आवाडे हे जिल्हा परिषद सदस्य होते. आवाडे यांनी नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांचे ते पुत्र आहेत. आमदार आवाडे हे गेली पाच वर्षे भाजप सोबत आहेत.