दिलबहार तालीम विजयी, उत्तरेश्वर पराभूत
schedule24 May 23 person by visibility 284 categoryक्रीडा
दिलबहार विजयी, उत्तरेश्वर पराभूत
कोल्हापूर
येथील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या अटलबिहारी वाजपेयी चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाचा ३-० अशा गोलफरकाने पराभव केला. तटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केली आहे.
बुधवारी झालेल्या सामन्यात उत्तरेश्वर संघाविरोधात दिलबहार तालीम मंडळ झकास खेळाचे प्रदर्शन केले. पूर्वार्धात २१ व्या मिनिटाला दिलबहारच्या रोहन दाभोळकरच्या पासून पासवर स्वयंम साळुंखेने मैदानी गोलची नोंद केली. 28 व्या मिनिटाला दिलबहारने उत्तरेश्वरला दुसरा धक्का दिला. तुषार पुनाळकरच्या पासवर स्वयंम साळोखेने हेडद्वारे चेंडूला जाळ्यची दिशा दाखवली. स्वयंमचा हा दुसरा गोल होता. मध्यंतरास दिलबहार तालीम मंडळाने २-० अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धातील खेळावरही दिलबहारची छाप होती. ७६ व्या मिनिटाला खुर्शीद राज अली याने मैदानी गोल करत दिलबहारच्या तिसऱ्या गोलची नोंद केली. पूर्ण वेळेत दिलबहारने तीन गोलची आघाडी कायम टिकवत सामना जिंकला. दिलबहारच्या स्वयंम साळोखे याची सामनावीर म्हणून तर उत्तरेश्वरच्या इंद्रजीत शिंदे याची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली.
गुरुवारचा सामना
बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध सोल्जर ग्रुप, दुपारी चार वाजता.