नर्सकडून लाच स्वीकारताना क्लार्क पोलिसांच्या जाळ्यात
schedule09 Mar 23 person by visibility 679 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
परिचारिकेकडून पाच हजाराची लाच स्वीकाराताना कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमधील लिपीक हुसेनबाशा कादरसाब शेख (वय ४७, रा. नागोबा मंदिराच्या मागे, शुक्रवार पेठ, मुळ गाव, कर्निक नगर, जिजामाता बागेजवळ, सोलापूर शहर) याला लाचलुचपत विभागाने पकडले.
पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. या गुन्ह्यातील तक्रारदार या सीपीआर हॉस्पिटलमध्ये परीचरिका पदावर काम करत असून त्यांना नोकरीतील पुढील लाभ मिळवण्यासाठी स्थायित्व प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकाकडे अर्ज दिला होता. जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या सहीचे स्थायित्व प्रमाणपत्र वीस दिवसापूर्वी त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपीक शेख यांच्याकडे दिले. प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदार परिचारिकेकडे शेख याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरुवारी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीची ताबडतोब पडताळणी केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून पंच साक्षीदारासमक्ष तक्रारदार परिचारिकेकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपीक शेख याला रंगेहात पकडण्यात आले.
पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, पोलिस उप निरीक्षक संजय बंबरगेकर, हेड कॉन्स्टेबल विकास माने, पोलिस नाईक सचिन पाटील, रुपेश माने, सूरज अपराध यांनी कारवाईत भाग घेतला.