रद्द करा-रद्द करा, शिक्षण सेवक पद रद्द करा ! हजारो शिक्षकांचा रस्त्यावर उतरुन आक्रोश !!
schedule21 Mar 25 person by visibility 1239 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षण सेवक पद रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात हजारो शिक्षकांनी रस्त्यावर उतरुन आक्रोश केला. ‘रद्द करा-रद्द करा, शिक्षण सेवक पद रद्द करा !, संच मान्यतेचा अन्यायीकारक जीआर रद्द करा’अशी जोरदार मागणी केली. शुक्रवारी (२१ मार्च २०२५) भर दुपारी शहराच्या विविध भागातून निघालेल्या या मोर्चाने साऱ्यांचे लक्ष वेधले. टाऊन हॉलपासून सुरू झालेला मोर्चा शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडकला.महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे आयोजित आक्रोश मोर्चाला विविध शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला.
‘एक, दोन, तीन, चार-शिक्षण सेवक पद करा हद्दपार, समान काम समान वेतन- पूर्ण पगार माझा अधिकार, एकच मिशन जुनी पेन्शन, पंधरा मार्चचा संच मान्यतेचा सरकारी आदेश रद्द करा, पटाचा नुसता बहाणा-शाळा बंद करण्याचा निशाणा, हम सब एक है, जुनी पेन्शन सेफ है !’अशा घोषणा आणि या आशयाचे फलक हाती घेऊन शिक्षक आंदोलनात उतरले. दुपारी मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वी सगळे शिक्षक टाऊन हॉल येथे जमले. या ठिकाणी, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षक नेते भरत रसाळे, प्राथमिक शिक्षक संघाचे (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) राज्य संपर्कप्रमुख राज मोहन पाटील, प्राथमिक शिक्षक समितीचे विभागीय अध्यक्ष अर्जुन पाटील, शिक्षक संघ थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष रवी पाटील, पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन, प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष सदानंद शिंदे, शिक्षक संघाचे दिलीप माने, शिक्षक बँकेचे संचालक अमर वरुटे, शिक्षक किरण शिंदे, शिक्षिका नीलम जाधव यांची भाषणे झाली. सी. एम. गायकवाड, आय. सी. शेख यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
‘शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, शिक्षण सेवक पद हे अन्यायी आहे. या पदासंबंधीचा शिक्षकांचा आक्रोश सरकारने जाणून तत्काळ कार्यवाही करावी. शिक्षकांचा हा आवाज सरकारपर्यत पोहोचला आहे.’ अशा शब्दांत पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या. टाऊन हॉल ते शिक्षण उपसंचालक कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी बोलताना जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी ’समान काम-समान वेतन या सूत्रानुसार शिक्षण सेवक पद रद्द होणे आवश्यक आहे. जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. सरकारने शिक्षकांच्या मागण्या गांभीर्याने घेऊन सोडवणूक करावी, अन्यथा राज्यस्तरावर आंदोलन केले जाईल.’असा इशारा दिला.
आंदोलनात शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर, शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब निंबाळकर, राजेंद्र पाटील, रामदास झेंडे, शिवाजी रोडे -पाटील, पद्मजा मेढे, गजानन कांबळे, शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, मारुती दिंडे, उदय पाटील, महादेव डावरे, उमेश देसाई, संतोष आयरे, राजेंद्र कोरे, जुनी पेन्शन संघटनेचे राज्य सहकोषाध्यक्ष श्रीनाथराव पाटील, प्रकाश गुठ्ठे, राहुल कांबळे, संजय भोसले, बी.एल. कांबळे, विजय रामाणे, बालाजी पांढरे, निलेश कारंडे, मारुती फाळके, आरती पोवार, संगीता कडूकर, संजय पाटील, गजानन कुंभार, अमोल गायकवाड, सतीश रणशिंगे, विनायक गिरी, रामेश्वर विभुते, आनंद पाटील, संतोष जुगळे, मारुती पोवार, दिलीप वाळवेकर यांच्यासह शिक्षक मोठया संख्येने सहभागी झाले होते.