बाटलीमुक्त रंकाळा तलाव परिसर ! स्वच्छतेसाठी सरसावले अनेक हात !!
schedule14 May 23 person by visibility 492 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘बाटलीमुक्त रंकाळा तलाव ’असा निर्धार करत या परिसराच्या स्वच्छतेसाठी रविवारी (ता.१४ मे) अनेक हात सरसावले. या स्वच्छतामोहिमेत रंकाळा तलाव परिसरातील मद्याच्या सुमारे पाच हजाराहून अधिक बाटल्या गोळया केल्या. या साऱ्या बाटल्या पोत्यात जमा करुन मद्यप्रेमींचा निषेध केला.
व्हाईट आर्मीच्या बालसंस्कार शिबिरातील बालचमू, रंकाळा संरक्षण व संवर्धन समिती, रंकाळा वॉकर्स,खणविहार मंडळ, माऊली योगा ग्रुपच्यावतीने ही मोहिम राबविण्यात आली.
सध्या रंकाळा पक्षी विहार परिसरात व्हाईट आर्मीच्यावतीने आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार शिबिर सुरू आहे.या शिबिरात १३० विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत. या शिबिरात सुसंस्कारित विद्यार्थी घडवण्याचे काम सुरू आहे. रविवारी रंकाळा परिसरातील स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये शेकडो हातांनी खणविहार परिसर आणि श्रीकृष्ण मंदिर परिसरात तळीरामांनी केलेला मद्याच्या बाटल्यांचा कचरा,प्लास्टिक ग्लास आणि सर्व कचरा गोळा केला.या सर्व मध्याच्या बाटल्या व्हाईट आर्मीच्या कार्यालयाबाहेर रस्त्याच्या कडेला एकत्र लावून मद्यप्रेमींचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला.
व्हाईट आर्मींचे अशोक रोकडे, प्रा.एस.पी.चौगले यांनी रंकाळा परिसरात होणाऱ्या अवैध्य गोष्टी टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी पेट्रोलिंग करण्याची गरज असल्याचे सांगितले. राजेंद्र पाटील यांनी रंकाळा हा कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असल्याचे सांगून तो जतन करण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. जयश्री दळवी यांनी मनोगत व्यक्त केले या मोहिमेत व्हाईट आर्मीचे सदस्य प्रशांत शेंडे, विनायक भाट,गौरी सरनाईक,रंकाळा प्रेमी विजय कुंभार, विजय सावंत, यशवंत पाटील- कारभारी, संजय मांगलेकर,अभिजीत चौगुले, राजेंद्र इनामदार, राजशेखर तंबाके, आनंदराव कोरे, पद्माकर रेळेकर,दीपक गायकवाड, शिवाजी पाटील, सुभाष हराळे, विलास निकम, प्रमोद सरनाईक, स्वप्निल भस्मे ,स्वप्निल कारेकर, मयुरेश भोसले चेतन दोडवाड सहभागी झाले होते.