राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी अर्ज मागविले
schedule24 Nov 23 person by visibility 428 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जलशक्ती मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने जिल्हा ते ग्रामपंचायत पातळीवर जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना राष्ट्रीय जल पुरस्कार २०२३ देण्यात येणार आहे. जिल्ह्यात जलसंवर्धन व व्यवस्थापनाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालये, समाज संस्था व व्यक्तींनी या पुरस्कारासाठी १५ डिसेंबर २०२३ पर्यंत नामांकन भरावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संतोष पाटील यांनी केले आहे.
जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने २०१८ पासून राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात येत आहे. नामांकन हे प्रामुख्याने जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित नाविण्यपूर्ण काम करणारे उत्कृष्ट राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत, शाळा व महाविद्यालय, संस्था (शाळा व महाविद्यालय वगळून) समाज संस्था, पाणी वापर संस्था व उत्कृष्ट काम करणारी व्यक्ती यांच्या माध्यमातून www.awards.gov.in राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर १५ डिसेंबर २०२३ अखेर भरणे आवश्यक आहे. नामांकन भरण्यासाठी मागील एक वर्ष कालावधीत जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित काम केलेल्या संस्था व व्यक्ती पात्र असणार आहेत.
जिल्ह्यातून नामांकन भरलेल्या संस्था, व्यक्तींनी आपली संक्षिप्त माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या sbmkolhapur@gmail.com या मेलवर १८ डिसेंबर २०२३ अखेर सादर करावी, असे आवाहन जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट यांनी केले आहे.