भ्रम फोडणारा समाजच खरी संस्कृती निर्माण करतो – डॉ. गणेश देवी
schedule05 Dec 25 person by visibility 15 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘भ्रमांवर समाज संस्कृती उभी राहत नाही. भ्रमातून बाहेर पडणारा समाजच खरी संस्कृती निर्माण करतो. लेखक, समीक्षक डॉ. आनंद पाटील यांच्या ग्रंथातून हा मोलाचा संदेश मिळतो. समाजाच्या अज्ञानाच्या आधारे लोकांची विभागणी करुन वर्णव्यवस्था रुजविणाऱ्या प्रवृत्तींविरोधात पाटील यांनी सडतोड लेखन केले. त्यांच्या लेखनात बौद्धिक संघर्षाचे प्रभावी चित्रण आहे.’असे मत भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाने प्रकाशित व डॉ. आनंद पाटील लिखित, ‘सांस्कृतिक मीमांसा : समाज संस्कृती आणि साहित्य’, ‘जगभराचे सांस्कृतिक सिद्धांत : उपयोजनांच्या नव्या दिशा’, आणि ’सांस्कृतिक अभ्यास : जुने, नवे आणि भवितव्य’ या तीन ग्रंथांचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला. लेखक डॉ. पाटील यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या साहित्य, तुलनात्मक अभ्यास व संशोधनाबद्दल नागरी सत्कार करण्यात आला.डॉ. पाटील यांचा सपत्नीक सत्कार झाला. गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिर येथे गुरुवारी (चार डिसेंबर २०२५) हा कायर्यक्रम झाला.
डॉ. देवी, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, इतिहास अभ्यासक डॉ. वसंतराव मोरे, प्रा. डॉ. दीपक पवार, डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या उपस्थितीमध्ये ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. डॉ. देवी यांनी डॉ. पाटील यांच्या साहित्यातील बारकावे, संशोधन, समीक्षण असे विविध पैलू वैशिष्ट्यांसहित उलगडले. सत्काराला उत्तर देताना डॉ. पाटील यांनी, ‘तीन ग्रंथांचे संयुक्त प्रकाशन आणि माझा नागरी सत्कार हा माझ्यासाठी एका अर्थाने पुनर्जन्म आहे. साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या या तीन ग्रंथामध्ये भाषा अभ्यास, अध्यापन, संस्कृती, साहित्य आणि भाषांतर असे विविध पैलू मांडले. या तीन खंडाच्या लेखनात माझ्या आयुष्याचा अर्क उतरला आहे.’ डॉ. मोरे यांनी, ‘डॉ. आनंद पाटील यांचे भाषा, साहित्य, संशोधन, अध्यापन क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे.असे नमूद केले.डॉ. भालबा विभूते यांनी प्रास्ताविक केले. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मनिषा पाटील यांनी आभार मानले.