कोल्हापुरात होणार सुषिर महोत्सव, नामवंत कलाकारांचा सहभाग
schedule05 Dec 25 person by visibility 25 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पंडित पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलनाचे यंदा २५ वे वर्ष आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ११ व १२ डिसेंबर २०२५ रोजी कोल्हापुरात ‘सुषिर महोत्सव’होत आहे. सुषिर म्हणजे तोंडाने फुंकून वाजवणारे वाद्य. या महोत्सवात नामवंत वादक कलाकारांचा सहभाग आहे. अशी माहिती पंडित पन्नालाल घोष स्मृती फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. सचिन जगताप यांनी दिली. गायन समाज देवल क्लब येथे दोन्ही दिवशी सायंकाळी सहा वाजता संमेलनाला सुरुवात होईल.
संमेलनात अकरा डिसेंबर रोजी सॅक्सोफोन, ट्रंपेट, बासरी, सनई व सुंद्री वादनाचा कार्यक्रम आहे. सहा वादकांचे सुषिर वाद्य वादन या महोत्सवात होणार आहे. पहिल्यादिवशी मुंबईतील प्रसिद्ध सनई वादक योगेश मोरे, सॅक्सोफोन वादक प्रसाद बेंद्रे, ट्रंपेट वाजविण्यासाठी अविनाश कोळी येणार आहेत. कोल्हापूरच्या रसिकांना अशा प्रकारचा वेगळा कार्यक्रम ऐकायला मिळणार आहे. या कार्यक्रमाला येथील जीवनगाणे वाद्यवृंद साथ देणार आहे. १२ डिसेंबर रोजी अतिशय दुर्मिळ असलेले वाद्य म्हणजे सुंद्री वादनाचा कार्यक्रम आहे. सोलापुरातील भीमाण्णा जाधव हे आपली कला सादर करणार आहेत. त्यांच्याबरोबर धारवाड आणि हुबळी येथील साथीदार आहेत. या कार्यक्रमाचा कलारसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला वैजयंती कुलकर्णी, संदीप आफळे, तुषार वेसनेकर, राजेंद्र हांडे, सोहम जगताप आदी उपस्थित होते.