दमसाचे ३५ वे साहित्य संमेलन वाईला, संमेलनाध्यक्षपदी डॉ. सुनीलकुमार लवटे
schedule04 Mar 25 person by visibility 207 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे ३५ वे साहित्य संमेलन रविवारी (९ मार्च २०२५) सातारा जिल्ह्यातील वाई येथे होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांची संमेलनाध्यक्षपदी आणि कलासागर अॅकॅडमीचे प्रा. लहुराज पांढरे यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वाई येथे पहिल्यांदाच दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन होत असून सावकार लॉन्स, शहाबाग (वाई) येथे संमेलन होईल. सकाळी दहा वाजता संमेलनाचे उद् घाटन होईल. संमेलनात प्रकट मुलाखत, कविसंमेलन आणि कथाकथन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाड्.मयाचे अठरा खंडांचे संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे त्याचे नुकतेच प्रकाशन केले आहे. डॉ. लवटे यांनी अथक परिश्रमातून साकारलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे औचित्य साधून यावर्षीचे साहित्य संमेलन वाई येथे घेण्याचा, तसेच त्याच्या अध्यक्षपदाचा बहुमान डॉ. लवटे यांना देण्याचा निर्णय दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने घेतला. कलासागर अकॅडमी या संस्थेने संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली.
दमसा संमेलनाचे अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेची आतापर्यंत ३४ संमेलने झाली आहेत. ग. ल. ठोकळ, रणजित देसाई, आनंद यादव, वसंत बापट, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, म. द. हातकणंगलेकर, शिवाजी सावंत, प्रा. चंद्रकुमार नलगे, डॉ. गंगाधर पानतावणे, प्रा. फ. मुं. शिंदे, आ. ह. साळुंखे, प्रा. एन. डी. पाटील, वामन होवाळ, डॉ. जयसिंगराव पवार, लक्ष्मण माने, गौतमीपुत्र कांबळे, अशोक नायगावकर, प्रमोद कोपर्डे, वसंत केशव पाटील, बाबा कदम, अनंत तिबिले, रंगराव बापू पाटील, डॉ. द. ता. भोसले, ज्ञानेश्वर मुळे, डॉ. आनंद पाटील, प्रा. मोहन पाटील, अप्पासाहेब खोत, किशोर बेडकिहाळ आदी नामवंत साहित्यिकांनी दमसाच्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.