पिवळा वाड्याजवळील एम.आर.चा करोनाने मृत्यू
schedule01 Aug 20 person by visibility 1028 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर
शुक्रवार पेठ पिवळा वाडा येथील तरुण मेडिकल रिप्रेझिंटिव्हचा (एम.आर) शुक्रवारी दुपारी करोनाने मृत्यू झाला. शुक्रवार आणि शनिवार पेठेत एका आठवड्यात दोघांचा करोनाने मृत्यू झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
बुधवारी सायंकाळी पिवळावाडा येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एमआर असलेला ४४ वर्षीय तरुण आणि त्यांची आई या दोघांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. एमआर असलेला तरुण गेले काही दिवस आजारी होता. त्याला श्वासोश्वासाचा त्रास सुरू झाल्यावर त्याने स्वत हून स्वॅब तपासणीस गेला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्याला उपचारास दाखल करण्यात आले. आज शुक्रवारी त्या तरुणाचा दुपारी मृत्यू झाला. त्यांच्या घरातील सर्वांचे स्वॅब तपासणीस पाठवण्यात आले आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, जावई, आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे.
एम्आर असलेल्या तरुणाला वैद्यकीय क्षेत्र आणि औषधांची माहिती होती. तरीही त्याला करोनाची लागण झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीच पिवळ्यावाड्याजवळील बुरुड गल्लीतही एका युवा किराणा दुकानदाराचा करोनाने मृत्यू झाला आहे. दोन युवकांचा मृत्यू झाल्याने परिसर हादरला आहे. एमआर असलेला युवक पिवळ्या वाड्याजवळील सोमेश्वर गल्लीत रहात होता. ही गल्ली बॅरिकेटस् लावून सील केली आहे. याच गल्लीतील एका डॉक्टरालाही करोना झाला आहे.
करवीर प्रातांधिकाऱ्यांनी शनिवार पेठ परिसर कंटेंटमेंट जाहीर केला असला तरी महानगरपालिकेने त्याची प्रभावी अंमलबजावणी केलेली नाही. शनिवार पेठेत गवळ गल्लीत १३, मिंच गल्लीत दहा, बुरुड गल्लीत तीन करोना रुग्ण सापडले आहेत.