कोल्हापुरात भरणार रानभाज्यांचे प्रदर्शन, पाककृती स्पर्धा, रोपे विक्रीस उपलब्ध !
schedule21 Aug 24 person by visibility 385 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्राच्या मातीत फुलणाऱ्या ,रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्यांचे प्रदर्शन २४ आणि २५ ऑगस्ट २०२४ दरम्यान कोल्हापुरात होत आहे. " लेट्स गेट बॅक टू अवर रूट्स " ह्या ब्रीदवाक्याचा अंगिकार करुन भरविलेल्या या प्रदर्शनात १६० हून अधिक रानभाज्या मांडण्यात येणार आहेत अशी माहिती निसर्ग अंकुर संस्थेचे प्राचार्य मधुकर बाचुळकर आणि एनजीओ कॅपशन २४, कोल्हापूर वुई केअर संस्थेचे अध्यक्ष मिलिंद धोंंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एनजीओ कंपॅशन २४, कोल्हापूर वुई केअर आणि निसर्ग अंकुरतर्फे दसरा चौक परिसरातील दिग्ंबर जैन बोर्डिंग येथे प्रदर्शन होत आहे. सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन खुले असेल.आरोग्यदायी, पौष्टिक व औषधी अशा रानभाज्यांची ओळख सर्वांना होऊन, निसर्गप्रेमींनी या रानभाज्या आपल्या परसबागेत लावाव्यात, तसेच शेतकऱ्यांनी महत्वाच्या दुर्मिळ रानभाज्यांची शेतात लागवड करुन त्यांचे फायदे मिळवावेत या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे संयोजकांनी सांगितले. प्रदर्शनासाठी मोहन माने यांचे मोठे सहकार्य लाभले आहे.
शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ.पी. एस.पाटील, कृषी अधिकारी उमेश पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, करवीर तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अनोख्या रानभाज्यांची चव चाखता यावी म्हणून, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतील. शिवाय रानभाज्या आणि त्यांची रोपे प्रदर्शनस्थळी विक्रीसाठी उपलब्ध असतील. यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे २५ ऑगस्ट दुपारी १२:३० वाजता प्रदर्शनस्थळी खास महिलांसाठी भरवण्यात येणारी रानभाज्यांची पाककृती स्पर्धा ( ग्रामीण व शहरी विभाग ) आणि त्यासोबत रोख पारितोषिक , सर्टिफिकेट जिंकण्याची संधी हे आहे. अधिक माहितीसाठी मंजिरी कपडेकर - 9373319495, ऐश्वर्या कपडेकर - 7620619495 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकानी केले आहे. पत्रकार परिषदेला,डॉ. अशोक वाली, पल्लवी कुलकर्णी, स्मिता सावंत, मंजिरी कपडेकर , अभिजित पाटील, सुशिल रायगांधी,किशोर शिंदे,अनिल वेल्हाळ,प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी, को -चेअरमन अमृता वासुदेवन, स्मिता घोसळकर, कविता घाटगे, राजू तेली आदी उपस्थित होते.