आम्हीही जिल्हा परिषद सदस्य, आम्हालाही हवा समान निधी ! काँग्रेस सदस्य सरसावले, पालकमंत्र्यांना भेटणार ! !
schedule02 Nov 26 person by visibility 28 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: जिल्हा नियोजन समितीकडून विविध विकासकामांसाठी जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीमध्ये विरोधी आघाडीच्या सदस्यांनाही समान निधी मिळावा. ‘आम्ही सुद्धा जिल्हा परिषद सदस्य आहोत, आम्हालाही हवा समान निधी” असा दावा करत काँग्रेस सदस्य निधीसाठी सरसावले आहेत. काँग्रेसच्या सदस्यांची सोमवारी (२ नोव्हेंबर २०२६) चर्चा झाली. तसेच काँग्रेसच्या सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांची भेट घेत निधी वाटपातील असमानतेकडे लक्ष वेधले. निधी वाटपात दुजाभाव करू नका यासाठी काँग्रेसचे सदस्य, येत्या चार दिवसात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेणार आहेत.
जिल्हा नियोजन समितीकडून विविध विकासकामांसाठी जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या २५४ कोटी निधी मिळतो. या निधी वाटपाचे अधिकार आमदार की जिल्हा परिषद सदस्यांना यावरुन गेले चार महिने वाद सुरू आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी, जिल्हा नियोजन समितीकडील संपूर्ण निधी वाटपाचे अधिकार जिल्हा परिषद सभागृहाला असावेत असा पवित्रा घेतला. कधी आमदार व सदस्य यांना ७० : ३० तर कधी ६० : ४० टक्के अशी चर्चा झाली.जिल्हा नियोजन समितीकडील निधी वाटपावरुन जिल्हा परिषद सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत सह्यांची मोहिम राबविली. ५० : ५० टकके निधी वाटप असा फॉर्म्युलाही चर्चेत आला.
निधी वाटपावरुन निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पालकमंत्र्यांना असतात. चार महिने हा वाद धुमसत राहिला. मध्यंतरी पालकमंत्री आबिटकर व मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात चर्चा झाली. मात्र निधी वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला नव्हता.नुकताच जिल्हा परिषदेतील सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांना काम सुचविण्यासंबंधी पत्रे गेली आहेत. मंत्री-आमदारांना साठ टक्के तर जिल्हा परिषद सदस्यांना चाळीस टक्के असा प्रस्ताव तयार केला आहे. या निधीतून दलित वस्ती सुधारणा, जनसुविधा, नागरी सुविधा, क वर्ग यात्रास्थळ, समृद्ध शाळा, नवीन खोल्या, अंगणवाडया प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांची बांधकामे करता येतात.
या निधीतंर्गत जिल्हा परिषद अध्यक्षांना तीन कोटी साठ लाख, उपाध्यक्षांना दोन कोटी ९५ लाख, समिती सभापतींना प्रत्येकी दोन कोटी ७५ लाख पन्नास हजार रुपये, सत्ताधारी ४१ सदस्यांना प्रत्येकी एक कोटी ५५ लाख तर विरोधी सदस्यांना प्रत्येकी ५० लाख असा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले जाते. मात्र जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या सदस्यांनी निधी वाटपमधील दुजाभावला विरोध केला आहे. काँग्रेसचे गटनेते व सदस्य एकनाथ पाटील, अभिजीत तायशेटे, संभाजी पाटणकर, सागर धुंदरे, संग्राम पाटील, सुदर्शन खोत, अमर पाटील शिंगणापूरकर, अमर चौगले, राहुल देसाई, रणधीर मोरे, विश्वनाथ पाटील आदींची चर्चा झाली. काँग्रेसच्या काही सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा खोत यांची भेट घेऊन चर्चा केली.