शिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय शिक्षण-उद्योग -शासन परिषद
schedule12 Feb 25 person by visibility 109 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ येथे १४ फेब्रुवारी व शनिवार, १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये 'शिक्षण, उद्योग आणि शासन परिषद १.०' चे आयोजन केले आहे. ही परिषद 'विकसित भारत २०४७ साठी नवोपक्रम आणि स्टार्टअप्स' या विषयावर होत आहे. याकरिता देशभरातील विविध विद्यापीठे, उद्योग व शासनाच्या संलग्नित विभागातील मान्यवर मंडळी सहभागी होत आहेत. अशी माहिती प्रकुलगुरू पी. एस. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवाजी विद्यापीठ, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्र यांच्या विद्यमाने परिषद होत आहे.
परिषदेत समाजातील तज्ञ व्यक्तींकडून स्टार्टअप संकल्पनेविषयी मार्गदर्शन व प्रोत्साहनपर व्याख्याने होतील. विषयातील तज्ञ आणि यशस्वी उद्योजक यांच्या सहभागातून चर्चासत्राचे आयोजन केले आहे. १४ फेब्रुवारी रोजी परिषदेचे उद्घाटन आय.आय.टी. कानपूरचे माजी संचालक व्याख्याते प्रा. (डॉ.) संजय धांडे यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर साऊंड कास्टिंग उद्योगाचे प्रमुख आनंद देशपांडे आपले विचार व्यक्त करतील. यानंतर टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस प्रदेश प्रमुख श्री. ऋषीकेश धांडे हे ‘व्यावसायिक आयुष्याची तयारी’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करतील. 'माने ग्रुप ऑफ कंपनीज्' चे संस्थापक संचालक ज्येष्ठ उद्योजक रामदास माने, पुणे हे ‘उद्योजक घडण्यामागची प्रक्रिया’ याविषयी पुढील पुष्प गुंफणार आहेत. यानंतर टी-हब, हैदराबाद (तेलंगणा) या नावाजलेल्या नवोपक्रम संस्थेचे डॉ. राजेश कुमार आडला हे ‘प्रोडक्ट लीडरशीप’ याविषयी सर्वंकष माहिती देतील.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी १५ फेब्रुवारीला बारामती अॅग्रो ट्रस्टचे तज्ञ डॉ. संतोष कारंजे हे ‘कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ यावर आपले विचार व्यक्त करतील. सरकारच्या प्रयोगशाळेचे डॉ. पी.पी. वडगांवकर, व डॉ. सी.व्ही. रोडे, कौशल्य विकास विभाग, कोल्हापूरचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम, जिल्हा उद्योग केंद्राचे अनमोल कोरे, के.पी. मशिन्स चे संजय पेंडसे, शिंपुगडे ग्रुपचे बी.एस. शिंपुगडे हे सहभागी होतील. महिला उद्योजकांसाठीच्या चर्चासत्रात शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. ज्योती जाधव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या श्रीमती सुजाता कणसे, प्युअरमी संस्थेच्या संस्थापिका शर्मिली माने, अवनि संस्थेच्या संस्थापिका अनुराधा भोसले, भारती डिजिटलच्या तनुजा शिपूरकर आणि सुप्रिया ढपाळे-पोवार या मार्गदर्शन करतील. पत्रकार परिषदेस डॉ. प्रकाश राऊत, डॉ. सागर डेळेकर, सुभाष माने उपस्थित होते.