मार्केट सेसच्या विरोधात व्यापाऱ्यांचा बंद ! कलेक्टर ऑफिस समोर निदर्शने !!
schedule05 Dec 25 person by visibility 22 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन, प्रतिनिधी कोल्हापूर : मार्केट सेस विरोधात कोल्हापुरात व्यापार व्यवसायिकांनी बंद पुकारला. 'रद्द करा, रद्द करा, मार्केट सेस रद्द करा..... जीएसटी कायदा सुटसुटीत करा” या आशयाचे फलक हातात घेत व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशव्दार येथे निदर्शने केली. त्यानंतर तहसीलदार (गृह शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय स्वप्निल पवार यांना निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा हा १९६३ साली लागू झाला. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर मिळावा हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून कायदा अस्तित्वात आला आणि सर्व महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन झाल्या. बाजार समिती आवार सोडून असलेल्या उपबाजार व तालुक्यात पूर्वी सेस लागत नव्हता. कालांतराने जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या उपविधीमध्ये वारंवार बदल करून बाजार समितीने आवारा बरोबर सर्व ठिकाणी मार्केट सेस लावण्यास सुरुवात केली. जीएसटी लागू करीत असताना ‘एक देश, एक कर’ या संकल्पनेनुसार सर्व करांचा जीएसटी मध्ये समावेश होईल असे सांगितले होते. तरी देखील आज जीएसटी सोबत मार्केट सेस लागू आहे. मार्केट सेस विरोधातील आंदोलनाची ही फक्त सुरुवात असून सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती सेस रद्द न केल्यास बेमुदत बंद आंदोलन पुकारले जाईल असे सांगितले.
चेंबरचे माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीप कापडिया, धान्य व्यापारी वैभव सावर्डेकर यांनी मार्केट सेस विरोधात तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथील कार्यलय अधिक्षक उदय उलपे यांना निवेदन दिले. तसेच मार्केट कमिटीचे सचिव तानाजी दळवी यांची भेट घेऊन जीएसटी असताना मार्केट सेस ची वसूली का केली जाते अशी विचारणा केली. यावेळी दळवी यांनी मार्केट सेससंबंधी बाजार समिती संचालकांच्या बैठकीत चर्चा होईल. यातून मार्ग काढू असे सांगितले. यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील, भरत ओसवाल, मानद सचिव प्रशांत शिंदे, अजित कोठारी, ग्रेन मर्चंटस् असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय कागले, श्रीनिवास मिठारी, अमर क्षीरसागर, विवेक नष्टे, धन्यकुमार चव्हाण, धर्मेंद्र नष्टे, किरण तपकीरे, भाजीपाला मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रहीम बागवान, फळ मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष नईम बागवान, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे विजय हावळ, कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानबाग, शाहूपुरी मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष निलेश पटेल, जयेश ओसवाल, राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे रमेश कारवेकर, रणजीत पारेख, इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनचे अनिल धडाम, कोल्हापूर फुटवेअर्स असोसिएशनचे शिवाजीराव पोवार, पानपट्टी असोसिएशनचे अरुण सावंत, नारळ व्यापारी असोसिएशनचे अविनाश नासिपुडे, तौफीक मुल्लाणी, अॅड इंद्रजित चव्हाण, सचिन पाटील उपस्थित होते.