+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule07 Oct 24 person by visibility 211 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “जगात व्यक्ती हेच सर्वात मोठे ज्ञानपीठ आहे. तर माणुसकी हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे, म्हणून मनुष्यधर्माची उपासना करायला हवी. प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र असा धर्म आहे. त्यापर्यंत पोहोचता आले पाहिजे. त्यासाठी माणसाला माणूस म्हणून जागविणारा कृतीशील विचार हवा.जे सत्यासाठी, ध्येयासाठी प्राणार्पण करतात, आपल्या भूमिकेसाठी त्यागाला सिद्ध होतात जगात तेच मोठे होतात. जगात मारणारे कधी मोठे झाले नाहीत, आणि समाजासाठी मरणारे कधी लहान राहिले नाहीत. प्रत्येक गोष्ट बुद्धिप्रामाण्यवादाच्या कसोटीवर तपासली पाहिजे, हेच चार्वाक व पानसरे विचाराचे सूत्र आहे. अनुभव हाच गुरु मानून चार्वाक जगले. शिवाय गरीबांच्या बाजूने बोलणारा जगातील पहिला माणूस हा चार्वाक होय.” ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुरेश द्वादशीवार हे अनुभवशील विचार मांडत होते, आणि सभागृहातील उपस्थित शेकडो जण हा विचार मनात साठवत होते.
  निमित्त होतं साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अमृ़तमहोत्सानिमित्त आयोजित व्याख्यानाचे. डॉ. सुनीलकुमार लवटे अमृतमहोत्सव समिती, कोल्हापूरतर्फे आयोजन केले होते. येथील राम गणेश गडकरी सभागृहात सोमवारी सायंकाळी डॉ. द्वादशीवार यांच्या व्याख्यानातून विचारमंथन घडले. सहजसोप्या भाषेत मांडणी, अभ्यासपूर्ण विवेचन, जगण्यातील दैनंदिन गोष्टीपासून राष्ट्रीय-आंतरराष्टीय घडामोडींचा संदर्भ आणि विविध धर्माची चिकित्सा करत द्वादशीवार यांनी ‘चार्वाक ते पानसरे’ हा वैचारिक धागा गुंफला. एक तास सतरा मिनिटाच्या भाषणात त्यांनी देशातील सामाजिक स्थिती, राजकीय घडामोडीवर नेमकेपणाने बोट ठेवत उपस्थितांना भूमिका घेण्याची हीच वेळ योग्य असल्याची जाणीवही करुन दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनीही मनोगत व्यक्त केले.
‘सत्ता व धर्म एकत्र येतात तेव्हा हिंसा होते. पिस्तुल गोळी चालवित नाही. पिस्तुलामागील माणूस गोळी चालवित असतो. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे, एम कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या खुनाचे सूत्रधार एका विचारधारेचे आहेत यावर त्यांनी बोट ठेवले. ‘अनुभव ही जगातील पहिली शाळा, अनुभवाच्या आधारे समाज मोठा होतो. विद्यापीठात केवळ पुस्तके शिकवतात. अनुभवाचं ज्ञान वर्गाच्या दाराबाहेर बंद केले . समाजात आजही जातीभेद, विषमता, महिलांना दुय्यम नागरिकत्व का ? असा खडा सवालही द्वादशीवार यांनी उपस्थित केला.
‘ धर्मानं संस्कार, व्यवस्था जगण्याची शिकवणही दिली, पण त्याच वेळी दुसरी बाजूही तपासली पाहिजे. जी गोष्ट अनुभवाला येत नाही ती खरी मानायची ही अंधश्रद्धा आहे. समाजातील विषमतेला धर्मानी बळ दिले. धर्माची समाजाच्या मनावरील घट्ट पकड, अनुभवापेक्षाही शब्द महान अशी धारणा यामुळे कोणी चिकित्सा करत नाही. मुळात धर्म सनातन आहे हे वचनच असत्य आहे. प्रत्येक धर्माच्या स्थापनेच्या जन्मतारखा आहेत. ज्यांच्या जन्मतारखा सांगता येतात ते सनातन कसे ? मुळात दैवतसुद्धा गरजेप्रमाणे बदलली जातात. राजकारण्याइतकेच प्रत्येक धर्माने लबाडया केल्या आहेत. जगातील कोणताही धर्म महिलांना, गरीबांना न्याय देऊ शकला नाही. धर्म जेव्हा कडवे होतात तेव्हा ते राजकारण्यांहून अधिक हिंसक होतात. सामूहिक नरसंहार झाल्याच्या घटना जगभरात घडल्या आहेत.
धर्मसत्ता-राजसत्ता-अर्थसत्तेचा मिलाफ हा सामाजिक स्वास्थासाठी घातक
द्वादशीवार म्हणाले, ‘धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्तेचा मिलाफ हा सामाजिक स्वास्थासाठी घातक आहे. या तीन सत्ता ज्यावेळी एकत्र आल्या त्यावेळी त्या अधीक हिंस्त्र बनतात. या तीन घटकांना कोणत्याही गोष्टीची चिकित्सा नको असते म्हणून ते विद्वांनाचा खून करतात. ज्ञानी, विचारवंतांना तुरुगांत टाकतात. हे सारं पाहत असताना कधी-कधी आपण कोणत्या समाजात वावरतो असा प्रश्न पडत आहे. माणसाचे प्रश्न समाजात असतात, पण आज समाजच प्रश्न बनला आहे. देशातील २२ माणसाकडे ७० टक्के लोकांची संपत्ती आहे. दिवसेंदिवस समाज दरिद्री होत असताना अदानी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत वरच्या स्थानी कसा ? त्याला राजसत्तेची जोड मिळाली आहे. हे विचार करायला क्षमता लागते. कधीतरी भूतकाळाच्या कसोटीवर आपल्याला तपासण्यापेक्षा भूतकाळाला आपल्या कसोटीवर तपासले पाहिजे. भविष्याची वाटचाल केली पाहिजे.”
अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य जी. पी. माळी यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. समितीचे उपाध्यक्ष डॉ. बी. एम. हिर्डेकर, समितीचे सचिव विश्वास सुतार यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. समितीचे खजिनदार प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. रमेश जाधव, प्रभाकर आरडे,  प्राचार्य टी एस पाटील, साहित्यिक डॉ. राजन गवस, डॉ. अर्जुन चव्हाण, डॉ. रणधीर शिंदे, डॉ नंदकुमार मोरे, डॉ. मेघा पानसरे, सी एम गायकवाड, विनय पाटील, संपत गायकवाड, कॉम्रेड दिलीप पवार, संभाजीराव जगदाळे, संजय कळके, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त सागर बगाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. निशांत गोंधळी यांनी आभार मानले.