दोन हजार झाडे लावण्याचा ऋतूसंकल्प यशस्वी
schedule11 Aug 24 person by visibility 334 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक समृद्ध करण्यासाठी कोल्हापूरकरांनी आज पुढचे पाऊल टाकले आहे.‘माय ट्री, माय कोल्हापूर’ उपक्रमांतर्गत वृक्षप्रेमी व्यक्ती आणि नागरिकांच्या साथीने एकाच दिवशी एकाच ठिकाणी २ हजार झाडे लावण्याचा ‘ऋतूसंकल्प’ यशस्वी झाला याचा मनस्वी आनंद होत आहे. झाडांची निगा राखण्याबरोबरच आपल्या भावी पिढीपर्यंत ‘ झाडे लावा आणि झाडे जगवा’चा संदेश या माध्यमातून उपस्थितांनी द्यावा.. हरित कोल्हापूरचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केले. आमदार पाटील यांनी उपस्थितांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली.
आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून रविवारी राजाराम तलाव परिसरात एकाच वेळी २ हजार झाडे लावण्यात आली. या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार पाटील बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, २०१९ च्या निवडणूक जाहीरनाम्यात दरवर्षी पाच हजार झाडे लावण्याचे आपण जाहीर केले होते. यानुसार दोन वर्षे वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र कोरोना संकटाच्या काळात हे करणे शक्य झाले नाही. आज आपल्या सर्वांच्या साथीने राजाराम तलाव परिसरात दोन हजार झाडे लावली आहेत .
या झाडांची कायमस्वरूपी निगा राखण्याची जबाबदारी आपण घेतली आहे. उजळाईवाडी ग्रामपंचायतीचे यासाठी चांगले सहकार्य लाभले असून त्यांनी पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिले आहेत. उर्वरित तीन हजार झाडे मतदार संघात ठिकठीकाणी लावली जाणार आहेत.
दरम्यान या उपक्रमांतर्गत मोहगनी, फिल्टो फेरम, कडूलिंब, करंज, रबर, कदंब, टीबुबिया, हुंबर आदी वृक्षांची लागवड केली आहे. पर्यावरण रक्षण व हरित कोल्हापूरसाठी तरूणाईची भूमिका महत्वाची आहे. आज येथे उपस्थित असलेल्या व्यक्ती व संस्थांनी कोल्हापूर अधिक समृद्ध झाड लावून चांगले पाउल टाकले आहे. आता आपल्या पुढील पिढीला वृक्षारोपणाचे महत्व सांगून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महादेव नरके यांनी केले.