पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचा उद्घाटन सोहळा दिमाखात
schedule22 Apr 26 person by visibility 12 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :‘कोरोना साथीनंतर जनसंपर्क क्षेत्र अधिक महत्वाचे झाले आहे पण विश्वासार्हता टिकवणे हे महत्वाचे आहे. तसेच एआय टूलच्या वापरामुळे कामास गती मिळते मात्र आपत्कालीन स्थितीतही सत्य आणि नैतिकता जपणे आवश्यक आहे,’असे मत विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी व्यक्त केले.
पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या (पीआरएसआय) कोल्हापूर चॅप्टर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर भारतीय सुरक्षा सेनेच्या दक्षिण कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.रवींद्र चिंचोलकर, कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्ष प्रा.डॉ. निशा मुडे-पवार, सचिव विश्वजीत भोसले, कोषाध्यक्ष सचिन मोरे उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाच्या सभागृहात कार्यक्रम झाला.
यावेळी बोलताना डॉ.रवींद्र चिंचोलकर म्हणाले, ‘जनसंपर्क आणि सत्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एआयच्या काळात माहितीची सत्यता तपासणे आवश्यक बनले आहे. एआयचा वापर शिकल्यास नोकऱ्यांची संधी उपलब्ध असेल. पीआरएसआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रात कामाची संधी मिळू शकते.’
भारतीय सुरक्षा सेनेच्या दक्षिण कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार झाला. यावेळी वारणा कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, माझगाव डॉकचे माध्यम सल्लागार पी.एस.पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, माहिती अधिकारी वृषाली पाटील, आकाशवाणी पुणे वृत्त विभागाचे माधव जायभाई, कोल्हापूर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, डॉ. राजेंद्र पारिजात, जेष्ठ पत्रकार डॉ. दशरथ पारेकर, पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या डॉ.वृषाली बर्गे, कणेरी मठाचे जनसंपर्क अधिकारी विवेक सिद्ध, तुतारी जाहिरात संस्थेचे संचालक सचिन मोरे, सरदार जाधव, विवेक पोर्लेकर, टिटवे कॉलेजचे दिग्विजय कुंभार, रोहिणी साळुंखे, डायमंड हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी सुनील भस्मे आदीनी मनोगत व्यक्त केले. डॉ.अनुराधा ईनामदार व डॉ. चंद्रशेखर वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टर आणि पत्रकारिता विभाग, शिवाजी विद्यापीठातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.