तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर रंगकर्मी - कलाकारांचा बहिष्कार, दौऱ्यात काळे झेंडे दाखविणार
schedule31 Jul 26 person by visibility 53 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगीकरणाला रंगकर्मीचा विरोध कायम आहे. नाट्यगृहाची सुरक्षा, स्वच्छता आणि तांत्रिक बाबीसाठी आऊटसोर्सिंग यासाठी रंगकर्मीनी सहमती दर्शविली होती. मात्र नाट्यगृहाचे खासगीकरण मान्य नाही. महापालिका प्रशासन, पदाधिकारी, रंगकर्मी अशी संयुक्त बैठक खुल्या पद्धतीने झाली पाहिजे. त्यामध्ये प्रशासनाने, नाट्यगृह व्यवस्थापनाचा कार्यवाहीचा मसुदा जाहीर करावा असे खुले आव्हान रंगकर्मीनी दिले आहे. ‘नाट्यगृह खासगीकरण आम्ही खपवून घेणार नाही. महापौर रुपाराणी निकम व आयुक्त राजेंद्र भारुड यांनी रंगकर्मीना दोष देऊ नये. रंगकर्मीचे म्हणणे डावलून नाट्यगृहाच्या उद्घाटनचा कार्यक्रम होणार असेल तर मुख्यमत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमावर कलाकार, रंगकर्मी बहिष्कार टाकतील. तसेच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवू असा इशाराही रंगकर्मीनी, शुक्रवारी ३१ जुलै २०२६ पत्रकार परिषदेत दिला.
रंगकर्मी सुनील घोरपडे, अभिनेता आनंद काळे, नाट्य दिग्दर्शक करणसिंह चव्हाण, प्रसाद जमदग्नी यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे अस्तित्व कायम राहावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाट्यगृह खासगीकरणाला आम्ही कधीच सहमती दिली नव्हती. महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांसोबत या विषयी कधीच बैठक झाली नाही. खासदार शाहू महाराज व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये ज्या दोन बैठका झाल्या. त्यामध्येही आम्ही कधी खासगीकरणाला तयारी दर्शविली नाही. मुळात त्या बैठकीत हा विषय उपस्थित झाला नव्हता असेही रंगकर्मीनी सपष्ट केले.
रंगकर्मीनी मोफत कार्यक्रम करावेत, शहरवासियांची दिशाभूल करू नये असे वक्तव्य महापौर निकम यांनी केले होते. त्यावर भूमिका स्पष्ट करताना रंगकर्मी म्हणाले, ‘. नाट्यगृहातील प्रत्येक प्रयोग हा हाऊसफुल्ल होत नसतो. शिवाय प्रत्येक कार्यक्रम हा व्यावसायिक नसतो. हौशी कलाकार स्वखर्चाने प्रयोग करत असतात. राज्य नाट्य स्पर्धेत पदरमोड करुन नाटक करत असतात. नाट्यगृहाच्या खासगीकरणावरुन आयुक्त आणि महापौरांनी रंगकर्मीवर आरोप करु नयेत. आम्ही राजकारणी नाही, रंगकर्मी आहोत. कोल्हापूरच्या नाट्य चळवळ व सांस्कृतिक क्षेत्राविषयी महापौरांचे ज्ञान अपुरे दिसते.’असेही रंगकर्मी म्हणाले. पत्रकार परिषदेला नाटककार सुनील माने, अभिनेता संजय मोहिते, पद्माकर कापसे, वैशाली घोरपडे, राजश्री खटावकर, रोहन घोरपडे, दिनेश माळी, अमोल नाईक, रवी पोवार आदी उपस्थित होते.