राज्यातील २५ बडया अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, कोल्हापूरला तीन नवीन अधिकारी
schedule02 Apr 26 person by visibility 185 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी…राज्यातील प्रशासनातील अशा बडया २५ अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या झाल्या. राज्य सरकारने, दोन एप्रिल २०२६ रोजी बदलीचे आदेश दिले आहेत. या पंचवीस अधिकाऱ्यांमध्ये कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस व महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची बदली झाली आहे. तर कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी विजय राठोड, कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी राजेंद्र भारुड व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी श्रीमती डॉ. हसरत जस्मिन यांची बदली झाली. कोल्हापूर जिल्ह्याला तीन नवीन अधिकारी मिळाले.
येडगे यांची बदली छत्रपती संभाजीनगर महापालिका येथे आयुक्तपदी तर कार्तिकेयन एस यांची बदली सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहेत. नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी कुमार आशीर्वाद यांची बदली झाली. बुलढाणा जिल्हाधिकारीपदी प्रवीणकुमार देवरे यांची बदली झाली. अमोल येडगे यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी विजय राठोड यांची नियुक्ती झाली. कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी राजेंद्र भारुड यांची बदली झाली. रत्नागिरी येथील श्रीमती डॉ. जस्मिन यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली. अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सत्यम गांधी, तर कोल्हापूच्या महापालिका के. मंजुलक्ष्मी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली.
लातूरच्या जिल्हाधिकारीपदी भारत बाष्टेवाड, जालना जिल्हा परिषदेच्या सीईओपदी कृष्णकांत कनवारीया, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी मिन्नू पी. एम यांच्याकडे सोपविली आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिका आयुक्तपदी संजिता मोहपात्रा, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी दिलीप स्वामी, जालना महापालिका आयुक्तपदीअंजली शर्मा, अमरावती महापालिका आयुक्तपदी वर्षा लढढा यांची बदली करण्यात आली.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारीपदी वर्षा ठाकुर घुगे, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्पदी प्राजीत नायर, जलजीवन मिशनच्या संचालकपदाची धुरा जी.श्रीकांत यांच्याकडे सोपविली. पशुसंवर्धन आयुक्तपदी किरण पाटील तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्तपदी दीपक सिंगला यांची बदली झाली.