सतेज पाटलांची गोकुळबद्दलची भावना लोकशाहीसाठी कमी अन स्वतःच्या राजकीय सुलभतेसाठी अधिक- महायुतीचा टोला
schedule03 Nov 26 person by visibility 217 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळच्या घडामोडीवरून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्राद्वारे उपस्थित केलेले विविध प्रश्न, शासन नियुक्त संचालक संख्येवरून केलेल्या आरोपाला महायुतीने जोरदार उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुरलेकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बलुगडे व जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम यांनी संयुक्तपणे पत्रक प्रसिद्धीस देत आमदार पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत
पत्रकात म्हटले आहे, 'आमदार सतेज पाटील यांनी गोकुळमधील घडामोडींबाबत पत्र लिहून ५.५ लाख दूध उत्पादकांच्या हिताची आणि लोकशाहीची चिंता व्यक्त केली आहे. त्यांची भूमिका आम्ही वाचली. मात्र त्यांच्या या भावना लोकशाहीसाठी कमी आणि स्वतःच्या राजकीय सुलभतेसाठी अधिक असल्याचे जाणवले.
गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ संचालक त्यांचे निवडून आले, त्याच पद्धतीने महायुतीचे बारक संचालक याच जिल्ह्यातील मतदारांनी निवडून दिले आहेत. त्यामुळे ५.५ लाख दूध उत्पादकांचा कौल केवळ आपल्यालाच मिळाला, अशा आविर्भावात सतेज पाटील यांनी राहू नये. एका जागेच्या फरकाने मिळालेला विजय म्हणजे संपूर्ण जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व नव्हे, याची जाणीव त्यांनी ठेवावी. विरोधी आघाडीला १३ जागा मिळालेल्या आहेत. अध्यक्ष निवड करण्यासाठी आम्ही कुणाचीही अडवणूक केलेली नाही. त्यांनी त्यांचा अध्यक्ष जरूर करावा. आमच्यावर विरोधकांची भूमिका सोपवलेली आहे. ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत आहोत.
निवडणुकीमध्ये महायुतीतील अंतर्गत मतभेदांचा फायदा त्यांना झाला, हे आम्ही मान्य करतो. पण; त्यातून जिल्ह्याचा संपूर्ण राजकीय जनाधार बदलला, असा निष्कर्ष त्यांनी काढू नये. या काठावरच्या विजयाच्या आधारे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय प्रतिनिधित्व आपल्याकडेच असल्याचा दावा करणे म्हणजे उर्वरित मतदारांच्या कौलाकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे.
२५ संचालकांच्या मंडळात गणपूर्तीसाठी १४ संचालकांची आवश्यकता असल्याचा मुद्दा गोकुळच्या पोटनियमांमधून निर्माण झाला आहे. हा नियम आम्ही निवडणुकीनंतर तयार केलेला नाही. आमचे १२ संचालक हे आमच्या मतदारांनी आमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिले आहेत. त्यामुळे केवळ दुसऱ्या बाजूची गणपूर्ती पूर्ण व्हावी म्हणून त्यांनी उपस्थित राहावे, अशी अपेक्षा करणे म्हणजे त्यांच्या मतदारांच्या विश्वासाशी प्रतारणा करण्यास सांगण्यासारखे आहे. तसेच, शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांकडून निवडणुकीपूर्वीच घोषणा झाली होती. तरीही जनतेने महायुतीला १२ जागांवर कौल दिला. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला कोणाचा वैयक्तिक विरोध हा आमचा मुद्दा नसून, आमच्या मतदारांनी दिलेल्या कौलाशी प्रामाणिक राहणे ही आमची भूमिका आहे.
अध्यक्ष निवडीवरून त्यांच्याकडून भावनिकतेची ढाल केली जात आहे. त्याबद्दल आम्ही इतकेच म्हणू इच्छितो की, आम्हालाही आमच्या बाजूने अध्यक्ष निवडताना गणपूर्तीसाठी केवळ दोन संचालकांची आवश्यकता आहे. मग सतेज पाटील त्यांच्या बाजूचे दोन संचालक आम्हाला देऊन आमच्या अध्यक्ष निवडीसाठी आणि गोकुळचा कारभार सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करतील का? ते असे सहकार्य करणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मग केवळ पेच तयार झाला आहे म्हणून स्वतःच्या सोयीसाठी आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करायची आणि त्यासाठी भावनिक आवाहने करायची, हा कोणता न्याय आहे? नियम दोन्ही बाजूंना समान असले पाहिजेत. शेवटी गणपूर्ती, अध्यक्ष निवड आणि अन्य कायदेशीर प्रश्नांचा निर्णय कायदा व संस्थेच्या पोटनियमांनुसारच झाला पाहिजे. त्यासाठी न्यायालयीन मार्ग उपलब्ध आहे आणि आम्ही त्याच मार्गाने आमची भूमिका मांडत राहू.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, हा पेच निर्माण झाल्यापासून सतेज पाटील समर्थकांकडून समाज माध्यमांवर चिथावणीखोर भाषा वापरली जात आहे. अश्या प्रकारची भाषा लोकशाहीला शोभणारी नाही. एका काठावरच्या विजयाला राजकारणातील अमरपट्टा समजण्याची चूक त्यांनी करू नये. राजकीय मतभेदांना धमक्यांचे स्वरूप देण्याऐवजी लोकशाहीच्या चौकटीत चर्चा व्हावी, हीच आमची अपेक्षा आहे. गेले अनेक दिवस आम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केले मात्र इथून पूढच्या काळामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांकडूनही जशास तसेच प्रत्युत्तर दिले जाईल.
गोकुळ ही कोणत्याही एका राजकीय पक्षाची किंवा नेत्याची मालमत्ता नसून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टातून उभी राहिलेली सहकारी संस्था आहे. तिचे हित जपताना कोणाच्याही राजकीय प्रतिष्ठेपेक्षा कायदा, लोकशाही आणि संस्थेचे हित महत्त्वाचे असले पाहिजे.