संपतराव गायकवाड यांचे निधन, शिक्षण खात्यातील प्रामाणिक अधिकारी हरपला
schedule13 Nov 24 person by visibility 1684 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :शिक्षण खात्यातील प्रामाणिक अधिकारी, प्रसिद्ध व्याख्याते माजी सहायक शिक्षण उपसंचालक संपतराव महिपतराव गायकवाड यांचे बुधवारी (१३ नोव्हेंबर) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६७ वर्षाचे होते. गुरुवारी, चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सानेगुरुजी वसाहत येथील सुर्यवंशी कॉलनीमधील निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यविधी होणार आहेत.
संपतराव गायकवाड यांच्या निधनाने व्याख्याता, प्रामाणिक अधिकारी व निस्वार्थ भावनेने काम करणारे व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दांत हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक शिक्षक ते सहायक शिक्षण उपसंचालक अशी त्यांची कारकिर्द. २०१५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची ‘आई’या विषयावरील व्याख्याने गाजली.
संस्कारक्षम पिढी घडावी यावर त्यांनी आयुष्यभर सदविचारांची रुजूवात केली. राज्यातील विविध भागात त्यांनी व्याख्याने दिली. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता समाजाप्रती कर्तव्य म्हणून त्यांनी व्याख्यानातून प्रबोधनाचे कार्य केले. त्यांना भ्रष्टाचाराविषयी प्रचंड तिटकारा होता. संपतराव गायकवाड यांचा जन्म १९५७ मधील. प्राथमिक शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. भेडसगाव येथे शिक्षक म्हणून काम केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केले.सांगली येथे उपशिक्षणाधिकारी म्हणून छाप पाडली. प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची ख्याती होती. शाळा तपासणीला गेल्यावरही ते स्वतचा दुपारच्या जेवणाचा डबा सोबत नेत होते. सेवानिवृत्तीनंतर लेखन, व्याख्यान या माध्यमातून प्रबोधन करत राहिले. ठिकठिकाणी व्याख्याने दिली.
बुधवारी, सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शिक्षण विस्तार अधिकारी सुजाता गायकवाड, भाऊ सेवानिवृत्त शिक्षक सी. एम. गायकवाड, मुलगा, मुलगी, जावई, बहिण असा परिवार आहे.