कोल्हापुरात मोठया नेत्यांच्या सभा ! प्रियांका गांधी शनिवारी, योगी आदित्यनाथ रविवारी दौऱ्यावर ! !
schedule14 Nov 24 person by visibility 215 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कोल्हापुरात महाविकास आघाडी आणि महायुतीच्यावतीने मोठया नेत्यांच्या सभा होत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या व पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची १६ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात सभा होत आहे. तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ १७ नोव्हेंबर रोजी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. दहाही विधानसभा मतदारसंघात प्रचारफेरी, कॉर्नर सभा याद्वारे वातावरण ढवळून निघत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी मोठया नेत्यांच्या सभा आयोजनाकडे महाविकास आघाडी आणि महायुती प्रयत्नशील आहे. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, इचलकरंजी, शाहूवाडी-पन्हाळा, कागल या ठिकाणी दुरंगी लढतीचे चित्र आहे. राधानगरी, हातकणंगले, शिरोळमध्ये तिरंगी तर चंदगडमध्ये बहुरंगी लढत होत आहे. हातकणंगले, राधानगरी, चंदगड येथे बंडखोरी झाली आहे.
लोकसभेनंतर आता विधानसभेत यश कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्शील आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या सोळा नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात गांधी मैदान येथे जाहीर सभा होणार आहे. सभेच्या नियोजनाच्या अनुंषगाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी बैठक घेतली. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी, महिला आघाडीसोबत चर्चा केली. प्रियांका गांधी यांची सभा यशस्वी करण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या. या नियोजनाच्या बैठकीला काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी सरला पाटील, भारती पोवार, सुलोचना नाइकवडे, दिपा पाटील, संध्या घोटणे यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
महायुतीतर्फे जिल्ह्यातील दहाही जागा ताकतीने लढविण्यात येत आहेत.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सतरा नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तपोवन मैदान येथे दुपारी बारा वाजता त्यांची जाहीर सभा होत आहे. या सभेच्या नियोजनाच्या अनुषंगाने भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक झाली. खासदार धनंजय महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, महिला आघाडीच्या रुपाराणी निकम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. योगींच्या प्रचारार्थ भाजपतर्फे शहरात ठिकठिकाणी पोस्टरबाजी करण्यात आली आहे.