विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात वंचित - डाव्या आघाडीची रॅली
schedule24 Jul 26 person by visibility 5 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ संविधान वाचवा शिक्षण वाचवा, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, विद्यार्थ्यावरील दडपशाही बंद करा, ’अशा मजकुराचे फलक हाती घेऊन आणि घोषणा देत वंचित बहुजन आघाडी व डाव्या आघाडीतर्फे गुरुवारी, २३ जुलै २०२६ कोल्हापुरात मोटारयसायकल रॅली काढण्यात आली.
जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित - डाव्या आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. कोल्हापुरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान वंचित व डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढली. राजर्षी शाहू समाधीस्थळापासून रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीदरम्यान वंचित व डाव्या आघाडीचे कार्यकर्ते , व्यापारी व व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी, मुलांच्या भवितव्यासाठी आंदोलनाला पाठिंबा द्या असे आवाहनही त्यांनी केले.
दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, महादेव मंदिर, मध्यवर्ती बसस्थानक, परीख पूल, राजारामपुरी, माऊली पुतळा, शाहू मिल चौक, पार्वती टॉकीज, आझाद चौक, टेंबे रोड, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, महापालिका चौक, सीपीआर मार्गे दसरा चौक अशी रॅली निघाली. याठिकाणी झालेल्या निषेध सभेत वंचित बहुजन आघाडीचे जनार्दन गायकवाड, भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य सतीश कांबळे, रघुनाथ कांबळे, सुभाष लांडे यांची भाषणे झाली. याप्रसंगी अतुल दिघे, अरुण जमणे, महाबोधी कमलाकर, अरुण सोनवणे, अमित नागटिळे, डॉ. आकाश कांबळे, महाभूती पद्माकर, प्रशांत आंबी, इर्शाद फरास, उत्कर्ष पवार, चंद्रकांत भोसले, निलेश गायकवाड आदी उपस्थित होते.