प्रल्हाद चव्हाणांनी स्वहिताची नव्हे तर समाजहिताची भूमिका अंगिकारुन आयुष्यभर कार्य केले- पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule28 Aug 26 person by visibility 38 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांनी स्वहिताचे नव्हे तर समाजहिताची भूमिका अंगिकारुन आयुष्यभर काम केले. त्यांच्यातील साधेपणा, त्यांची समाजाशी जुळलेली नाळ, समाजहिताची व समर्पित वृत्तीने काम करण्याची भूमिका सदैव प्रेरणादायी ठरेल.’असे उद्गार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.
माजी महापौर, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी, २८ ऑगस्ट २०२६ कोल्हापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. जीवन गौरव पुरस्कार वितरण, निष्ठावंत पुस्तिकेचे पुर्नप्रकाशन आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम झाला. खासदार शाहू महाराज हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजीव आवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी.पाटील, उपमहापौर अक्षय जरग, ऑल इंडिया मंडप व डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष दडूशेठ पुरोहित, उपाध्यक्ष राहूल मनोत, पश्चिम महाराष्ट्र चेअरमन सुनील माळी, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, गटनेते शारंगधर देशमुख, सभागृह नेते मुलीधर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे सभागृहात हा कार्यक्रम झाला. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात पत्रकार गुरुबाळ माळी, आप्पासाहेब माळी व सतिश घाटगे लिखित ‘कोल्हापूरचे महापौर’या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले.
याप्रसंगी दगडे मंडप डेकोरेटर्सच विजय सुदाम दगडे पाटील, एस एम पाटील मंडप काँन्ट्रक्टर सोलापूर येथील शिवकुमार सिद्रामाप्पा पाटील, संजय डेकोरेटर्सचे चंद्रकांत कृष्णा भोसले यांना जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ११ हजार रुपये रोख, फेटा, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.तर मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार किरण साऊंडचे शंकरराव दत्तोबा गवळी, युनायटेड डेकोरेटर्सचे नागोराव बाबुराव धुमाळ, लीबर्टी सीएमडी डेकोरेटर्सचे अब्दुलमज्जीद मेहबूब जमादार, नवरंग डेकोरेटर्सचे नजीर कादर पटवेगार, विश्राम डेकोरेटर्सचे विठ्ठलराव आनंदराव चौगुले, काटे डेकोरेटर्सचे महादेव गोविंद काटे यांना जाहीर झाला. त्यांच्या कुटुबियांतील सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पालकमंत्री आबिटकर यांनी भाषणातून दिवंगत माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडले. आबिटकर म्हणाले, ‘समाजकारण व राजकारण करताना चव्हाण कुटुंबीयांनी उत्कृष्ट समतोल राखला आहे. प्रल्हाद चव्हाण यांचा जीवनप्रवास पाहत आमच्या पिढीची समाजकारण व राजकारणात जडणघडण झाली. मंडप व्यवसायापासून सुरुवात करुन त्यांनी समाजकारणात, राजकारणात जे यश मिळवले ते निश्चित प्रेरणादायी आहे. सामाजिक कार्यातून चव्हाण कुटुंबियांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘एकमेकां साह्य करु अवघे धरु सुपंथ’ हे तत्व व लोकहितासाठी काम ही प्रल्हाद चव्हाण यांची शिकवण स्वीकारात सागर चव्हाण, सचिन चव्हाण काम करत आहेत. समाजसेवेचे तत्व पुढे चालवित आहेत. आता कोल्हापूर बदलत आहे. या बदलत्या कोल्हापूरसाठी काम करताना प्रल्हाद चव्हाण यांनी शहर व समाजासाठी ज्या समर्पित वृत्तीने काम केले, तोच वारसा साऱ्यांनी मिळून पुढे चालवू या.’
खासदार शाहू महाराज, ‘माजी महापौर प्रल्हाद चव्हाण हे आयुष्यभर दुसऱ्यांना सहकार्य, मदत करत राहिले. त्यांनी संकुचित वृत्ती कधी ठेवली नाही. पदाचा, लाभाचा विचार न करता पक्षासाठी काम करणारा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख कायम राहील.’असे नमूद केले. माजी महापौर सागर चव्हाण, स्थायी समितीचे माजी सभापती सचिन चव्हाण, नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी स्वागत केले. प्रल्हाद पाटील व प्रा. अशोक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तुकाराम पाटील यांनी आभार मानले. व्यासपीठावर महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, शिल्पा सोनुले, नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे,अभिजीत खतकर, अमर समर्थ, दुर्वास कदम, अश्किन आजरेकर, सचिन शेंडे, अर्चना कोराणे, प्रतिज्ञा उत्तुरे राहुल माने, मुश्ताक मलबारी, कॉम्रेड चंद्रकांत यादव, माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, रवींद्र आवळे, प्रकाश चौगुले, सुरेश डोणुक्षे , भैय्या शेटके आदींची प्रमुख उपस्थिती होती.