टीईटी परीक्षेसाठी राज्यभरात सहा लाखावर परीक्षार्थी, १८ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच
schedule18 Jun 26 person by visibility 20 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २८ जून २०२६ रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित केली आहे. राज्यभरातील ३७ जिल्हास्तरावर एकूण १७२७ केंद्रावर परीक्षा होणार आहे. या परीक्षेतंर्गत पेपर एकसाठी दोन लाख ५८ हजार ६१ तर पेपर दोनसाठी तीन लाख ४२ हजार ६४ असे एकूण सहा लाख १२५ उमेदवार परीक्षा देणार आहेत. पेपर एकसाठी ७०१ केंद्रावर तर पेपर दोनसाठी १०२८ केंद्रातील वर्गखोली, लॉबी, केंद्र संचालक कक्ष मिळून एकूण १८७१७ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुकत महेश चोथे यांनी दिली आहे.
परीक्षा केंद्रावर मेटल डिटेक्टर आहे. त्याद्वारे प्रत्येक परीक्षार्थीची हँड हेल्ड मेटल डिटेक्टरच्या सहायाने तपासणी होणार आहे. तसेच बायोमेट्रिक घेतले जाणार आहे. परीक्षार्थीनी मोबाइल, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर अशी उपकरणे परीक्षा केंद्रात घेऊन जाता येणार नाही. परीक्षार्थींनी पेपर एकला सकाळी ८.३० वाजता व पेपर दोनसाठी १२.३० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. सकाळच्या पेपरला सकाळी दहा वाजून दहा मिनिटानंतर व पेपर दोनसा दुपारी दोन वाजून दहा मिनिटानंतर कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही असे कळविले आहे. सर्व परीक्षा दालनामध्ये, परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर व केंद्र संचालकांच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.एकूण १४५६८ वर्गखोल्यामध्ये कॅमेरे असतील. परीक्षेला जाताना परीक्षार्थांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड यापैकी एक फोटो ओळखपत्राची मूळ व सत्यप्रत सोबत ठेवावे असे म्हटले आहे. परीक्षेतील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी उत्तरपत्रिका (ओएमआर) सोबत कार्बन कॉी असणार आहे. एक कार्बन कॉपी उमेदवारांसाठी असेल व दुसरी कार्बन कॉपी परीक्षा परिषदेची असेल. शिवाय प्रश्नपत्रिकेमधील प्रत्येक पानावर विशिष्ट क्रमांक व क्यूआर कोड असणार आहे. संचालक, सहसंचालक व उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे भरारी पथक प्रत्येक जिल्ह्यासाठी नेमले आहे.