ना पगारासाठी- ना बोनससाठी ! शिक्षकांचे आंदोलन शाळा वाचविण्यासाठी !! शुक्रवारी कलेक्टर ऑफिसवर महामोर्चा
schedule26 Sep 24 person by visibility 4006 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संचमान्यतेचा अन्यायकारी आदेश रद्द करावा, कंत्राटी शिक्षक भरतीचा आदेश मागे घ्या आणि वाडीवस्तीवरील शाळा वाचवा यासह प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोल्हापुरात जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी एकत्रितपणे २७ सप्टेंबर २०२४ रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. ना बोनससाठी-ना पगारासाठी ! आंदोलन शाळा वाचविण्यासाठी असा नारा देत जिल्ह्यातील ४६ शैक्षणिक संघटना आंदोलनात सहभागी आहेत. शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. एका दिवसाची सामुदायिक रजा काढून शिक्षक आंदोलनात सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षक, मुख्याध्यापकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
प्रभारी केंद्रप्रमुख डी पी पाटील - पंधरा मार्च २०२४ रोजीचा संचमान्यतेचा आदेश हा शैक्षणिक क्षेत्रासाठी मारक आहे. त्या आदेशान्वये कमी पटसंख्येच्या शाळा बंद होण्याचा धोका आहे. महाराष्ट्र हा डोंगराळी भाग आहे. एक शिक्षकी शाळा केल्या तर मुलांचे नुकसान होईल. शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम संभवतो. सरकारने तो आदेश मागे घ्यावा.
शिक्षिका वर्षा केनवडे – कंत्राटी शिक्षण व संचमान्यतेच्या विरोधात आंदोलन आहे.सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील पंधरा हजार शाळेतील एक शिक्षक कमी होणार आहेत. विद्यार्थ्यावर अन्याय होणार आहे. सरकारने संचमान्यतेचा निर्णय मागे घ्यावा. राज्य सरकारचे हे धोरण शिक्षणविरोधी आहे. यामधून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट दिसतो.
विषय शिक्षिका पद्मजा मेढे – कंत्राटी शिक्षक भरती, नवीन संचमान्यता आदेश हे अन्यायकारक आहेत. मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करुन शिक्षकांनी हे आदेश मागे घ्यावेत. ऑनलाइन कामाचा भडिमार शिक्षकवर्गावर होत आहे. शिक्षकांना मुलांना शिकवण्यासाठी वेळ द्या. ऑनलाइन कामे कमी करा.
शिक्षक तुषार पाटील- संचमान्यतेचा आदेश हा गरीबांचे शिक्षण काढून घेण्याचा डाव आहे. त्याला समाजातील सर्व थरातून विरोध होणे गरजेचे आहे. आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरात झाली आहे. शुक्रवारी होणाऱ्या आंदोलनात हजारो शिक्षक सहभागी होत आहेत. शाळा वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत.
सहायक शिक्षिका प्रियांका अमर चौगले-साजणे : शिक्षक सामूहिक रजा काढून आंदोलन करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा वाचविण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी हे आंदोलन आहे. कंत्राटी शिक्षक भरती व संचमान्यतेचा जाचक आदेश काढून सरकारने शिक्षकवर्गाला डिवचले आहे. आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या एकीची ताकत दिसून येईल.