ज्वारीचा फरसाणा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, सोलापुरी शेंगदाणा चटणी ! मिलेट-फळ महोत्सवास प्रारंभ !!
schedule01 Mar 25 person by visibility 583 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ज्वारीचा फरसाणा, नाचणीचे विविध पदार्थ, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, सोलापुरी शेंगदाणा चटणी अशा नानाविध वस्तू, फळे आणि विविध प्रकारच्या तृणधान्यांचे दालन कोल्हापुरात भरले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय कोल्हापूर आयोजित मिलेट व फळ महोत्सव २०२५ च्या निमित्ताने उत्पादक ते थेट ग्राहक ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर अशा विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित फळे व तृणधान्य महोत्सवात विक्रीसाठी ठेवली आहेत.
ताराराणी विद्यापीठ परिसरातील डॉ. व्ही.टी. पाटील स्मृती भवन येथे महोत्सव भरला आहे. एक ते पाच मार्च २०२५ या कालावधीत महोत्सव सुरू राहील. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते शनिवारी महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, नाबार्डचे उपसरव्यवस्थापक आशुतोष जाधव,, डॉ. अशोक पिसाळ, डॉ. योगेश बन व कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी अमोल येडगे यांनी पणन मंडळ आयोजित तृणधान्य व फळ महोत्सव 2025 चा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व स्टॉल्सना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली. कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले म्हणाले, ‘कृषी पणन मंडळ मागील वर्षापासून पौष्टिक तृणधान्याचा प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने दरवर्षी मिलेट महोत्सवाचे राज्यात आयोजन करीत असल्याचे सांगितले. अशा महोत्सवामुळे तृणधान्य व फळ उत्पादकांना आपला उत्पादित शेतमाल ग्राहकांना थेट विक्री करण्याची संधी प्राप्त झाली आहे. कोल्हापूरकरांनी या वर्षी सुद्धा मागील वर्षी प्रमाणे प्रचंड प्रतिसाद द्यावा. या कार्यक्रमास कृषी पणन मंडळाचे प्रतीक गोणुगडे, ओमकार माने, सत्यजित भोसले, अनिल जाधव, किरण जाधव, प्रसाद भुजबळ, पूजा धोत्रे, अमृता जाधव , संदेश पिसे इत्यादी उपस्थित होते. मॅग्नेट प्रकल्पाचे सल्लागार सुयोग टकले यांनी आभार मानले.