भोसलेवाडीत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचा शुभारंभ
schedule06 Jul 24 person by visibility 476 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :पंधराव्या वित्त आयोगातून उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रातून शहरातील गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सेवा सुविधा द्या. तसेच त्यांच्यावर चांगले उपचार करा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी केले.
महापालिकेच्यावतीने नव्याने सुरु केलेल्या तीन नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. कार्यक्रम भोसलेवाडी येथील दत्तोबा शिंदे व्यायाम शाळेजवळ घेण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडीक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के.मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन.एस, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.
कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत २८ आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर केली आहेत. यापूर्वी मैत्रांगण, सानेगुरुजी वसाहत व महाभद्रा रेसिडेन्सी लक्षतीर्थ वसाहत येथे नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. शनिवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.9 सदर बझार अंतर्गत भोसलेवाडी येथील दत्तोबा शिंदे व्यायाम शाळेशेजारी, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.10 सिध्दार्थनगर अंतर्गत अकबर मोहल्ला व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.11 मोरे माने नगर अंतर्गत प्रथमेश मंदिर सुर्वेनगर या ठिकाणी नवीन 3 नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत आरोग्य तपासणी व औषधोपचार मोफत करण्यात येणार आहेत माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी आभार मानले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उपशहर अभियंता रमेश कांबळे, वैभव माने उपस्थित होते