रुग्णांना तत्काळ स्थलांतरित करा, कोल्हापुरात पूरबाधित क्षेत्रातील पाच हॉस्पिटल्सना नोटिसा !
schedule20 Aug 25 person by visibility 320 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संभाव्य पूरस्थिती विचारात घेऊन महापालिका प्रशासनाने शहरातील पाच मोठया हॉस्पिटल्सना रुग्ण स्थलांतरित करण्यासंदर्भात नोटिसा लागू केल्या आहेत. यामध्ये पूरबाधित क्षेत्रातील पाच हॉस्पिटल्सचा समावेश आहे. यामध्ये नागाळा पार्क, महावीर कॉलेज परिसरातील डायमंड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस (विन्स) हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल तसेच कदमवाडी येथील ॲपल सरस्वती हॉस्पिटल व्यवस्थापनला सूचना केल्या आहेत.
नोटिसमध्ये संबंधित रुग्णालयांना विद्यमान रुग्णांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश आहेत. तसेच नव्या रुग्णांना दाखल न करण्याच्या सूचना आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास व रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित रुग्णालय प्रशासनावर राहणार असून, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पूरबाधित क्षेत्रातील नागरीकांनी पंचगंगा नदीची वाढती पाणीपातळी लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.