वाणी-कृती-आचरण-निती-उच्चार शुद्ध असल्यास जगण्यात समाधान - इंद्रजीत देशमुख
schedule29 Mar 26 person by visibility 13 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘संत साहित्यात जगण्याची प्रेरणा मिळते. संतांनी समाजाला कर्मप्रधानवाद शिकवला. त्यांनी कर्मकांड बुवाबाजीवर आसून ओढले. जगण्यात वाणी, कृती, आचरण, निती, उच्चार शुद्ध असले पाहिजेत तरच समाधान, सफलता लाभते.’असे मत संत साहित्याचे अभ्यासक व सेवानिवृत्त सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी व्यक्त केले.
येथील महावीर महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. जयवंत मारुती दळवी यांचा सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभ शनिवारी, २८ मार्च २०२६ आयोजित केला होता. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख बोलत होते. श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सचिव मोहन गरगटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे खजिनदार गुणवंत रोटे, संचालक सुषमा रोटे, स्नेहलता कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रा. दळवी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच ‘अंकुर’या पुस्तिकेचे प्रकाशन झाले.
संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांचा दाखला देत डॉ. देशमुख यांनी संत विचारकार्याचा समाजमनावरील प्रभाव मांडला. संपत्ती, सत्तापदे यापेक्षा
समाज सदविचार, सदवर्तनांची पालखी वाहतो. हजारो वर्षापासून ज्ञानोबा तुकोबांच्या पालखी सोहळा म्हणजे आदर्शवत उदाहरण आहे. संतांच्या विचारकार्यानुसार जीवन जगल्यास जीवनात समाधान लाभते, सफलता मिळते. प्रा. दळवी यांनी प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करताना संत साहित्याचा प्रचार, प्रसारही केला. आचरण, कृती, वाणी, शुद्ध ठेवत त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्नही केला. ’असे उद्गगार देशमुख यांनी काढले.
प्रा. दळवी म्हणाले, ‘कॉलेजमध्ये मी केवळ नोकरी केली नाही, तर एक खास नाते या शैक्षणिक संस्थेशी जुळले होते. १९८७ ते १९८९ या कालावधीत महावीर कॉलेजचा मी विद्यार्थी होतो. ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो, त्याच कॉलेजमध्ये १९९४ मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो. एकाच संस्थेत ३२ वर्षे सेवा करुन सेवानिवृत्त होताना वेगळा आनंद आहे. ’ याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी, प्रा.गोमटेश पाटील, प्रा. माधव शिंदे यांची भाषणे झाली. सचिव गरगटे यांनीही शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक जावेद मेस्त्री यांनी आभार मानले.