गोकुळतर्फे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पशुखाद्य वाटप
schedule08 Oct 25 person by visibility 95 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील पूरग्रस्त भागांतील शेतकरी व पशुपालकांना महालक्ष्मी पशुखाद्य १० मेट्रिक टन व टीएमआर मॅश ८ मेट्रिक टन इतकी मदत करण्यात आली. सोलापूर जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांचेकडे संघाचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, प्रा. किसन चौगले, बयाजी शेळके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे ही मदत सुपूर्त करण्यात आली. गोकुळ दूध संघाने एक सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त भागातील गायी-म्हैशी, लहान वासरे यांना मोफत पशुखाद्य देऊन मदत करण्याचा निर्णय गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळाने घेतला. त्यानुसार गोकुळ दूध संघाने सामाजिक जबाबदारीचा उत्कृष्ट आदर्श ठेवत पूरग्रस्त शेतकरी आणि पशुपालकांना तातडीची मदत पोहोचवून संवेदनशील भूमिका बजावली याबद्दल सोलापूर प्रशासनाने आभार व्यक्त केले आहे. यावेळी तहसिलदार सैपन नदाफ, गोकुळचे सोलापूर येथील दूध विक्रेते रवींद्र मोहिते , डॉ.सत्यजित पाटील व पशुखाद्य मार्केटिंग प्रतिनिधी रवींद्र लाड उपस्थित होते.