उज्ज्वल भविष्यासाठी गणितीय विचार सर्वदूर पोहचविणे आवश्यक
schedule21 Jul 25 person by visibility 56 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विकासासाठी गणिताचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. उज्वल भविष्याचा गणित हा पाया आहे. त्यामुळेच इतर शास्त्रांसोबत गणिताचा मूलभूत विचार सर्वदूर पोहोचविला पाहिजे असे प्रतिपादन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केले. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विलास आंबोळे यांनी लिहिलेल्या समग्र भूमितीय रचना या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये पार पडला.
प्रा. उमाकांत आवटे म्हणाले, आंबोळे यांनी मूलभूत भूमितीय रचनांपासून सुरुवात करून त्रिकोण, चौकोन, वर्तुळ ते अत्यंत क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या बहुभुजाकृती रचनांपर्यंतच्या रचना विश्लेषणासह क्रमवार कृतीद्वारे तसेच प्रमाणबद्ध आकृतीच्या माध्यमातून मांडल्या आहेत. सरला पाटील म्हणाल्या , आंबोळे हे गणितशास्त्र विषयाला वाहून घेतलेले व्रतस्थ शिक्षक आहेत आणि गणित हा त्यांचा आत्मा आहे असे गौरवोद्गार काढले. उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले यांनी या पुस्तकातून स्वयंअध्ययनाचा वस्तुपाठ मिळतो असे सांगितले.
यावेळी पुस्तकाचे अक्षर रचनाकार उमाकांत आवटे आणि मुद्रक व मुखपृष्ठ रचनाकार सलीम बैरागदार यांचा सत्कार करण्यात आला. प्रवीण आंबोळे यांनी स्वागत केले यश आंबोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी सिनेट सदस्य ॲड. अजित पाटील, ॲड. अभिषेक मिठारी, भरत रसाळे, भारती पवार, अनिल सोलापुरे, राजशेखर तंबाके, सुभाष महाजन, पांडुरंग कवडे, सूर्यकांत पाटील, विजय आंबोळे, सदाशिव देवताळे, विलास बारड, इरफान अन्सारी, महेंद्र कांबळे, भीमराव देसाई उपस्थित होते.