देवराज बोटिंग क्लबने रंकाळा तलावातील कचरा हटविला
schedule26 Jul 24 person by visibility 517 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जोरदार पावसामुळे रंकाळा तलाव तुडंब भरला आहे. पावसाच्या पाण्यासोबत परिसरातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, चपला व अन्य साहित्य रंकाळा तलावात मिसळले. प्लास्टिक कचरा रंकाळा तलावावर तरंगत होते. वाऱ्याच्या प्रवाहासोबत हा सारा कचरा रंकाळा तलावाच्या काठापर्यंत पोहचला. राजघाट, संध्यामठ व तलावाच्या अन्य बाजूच्या काठापर्यंत पसरला होता. देवराज बोटिंग क्लबमार्फत गुरुवारी सायंकाळी व शुक्रवारी सकाळी जवळपास दोन ट्राली कचरा रंकाळा तलावातून हटविला.
यामध्ये प्लास्टिक पिशव्या, चपला, बाटल्या व अन्य टाकावू साहित्याचा समावेश आहे. देवराज बोटिंग क्लबचे अमर जाधव यांच्या पुढाकाराखाली किरण जाधव, रवी जाधर, किरण् कांबळे, अक्षय कांबळे, हर्षद कांबळे, श्रीनिवास गुरव, यश गुरव यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. या साऱ्यांनी, रंकाळा तलावाच्या काठावर पसरलेला कचरा चार बोटीतून गोळा केला. जवळपास दोन ट्रॉली भरेल इतका कचरा तलावातून बाहेर काढण्यात आला. रंकाळाप्रेमींनी देवराज बोटिंग क्लबच्या स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले.
‘‘रंकाळा तलाव हा कोल्हापूर शहरवासिय व पर्यटकांचे आकर्षण आहे. देवदर्शनासाठी कोल्हापुरात आलेले भाविक, पर्यटक हमखास रंकाळा तलावाला भेट देतात. हा तलाव स्वच्छ राहावा, प्लास्टिक व अन्य कचरा पाण्यात मिसळून तलावातील पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी देवराज बोटिंग क्लबतर्फे स्वच्छता मोहिम राबवली. पावसाच्या पाण्यासोबत तलावात मिसळलेला कचरा बाहेर काढला.”
- अमर जाधव, देवराज बोटिंग क्लब