भाजपच महिला आरक्षणाच्या विरोधात, लोकांची दिशाभूल करण्यासाठी आता मोर्चोचे सोंग - आमदार विश्वजीत कदम
schedule28 Apr 26 person by visibility 20 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘महिला आरक्षणाला काँग्रेस पक्षाने नेहमीच पाठिंबा दिला आहे. तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राज व्यवस्थेत महिलांना आरक्षणाचा प्रस्ताव आणला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचनेचा घाट घातला होता. भाजपच महिला आरक्षण विरोधात आहे, आणि आता लोकांची दिशाभूल करण्यासाठी मोर्चे काढत आहेत.भाजपची धोरणे ही हुकूमशाही विचाराची आहेत, म्हणून काँग्रेसने मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध केला.’ अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी मांडली. २०२३ मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षणाची भाजपाने अंमलबजावणी करावी हे काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केल्याचे कदम यांनी सांगितले.
कोल्हापूर शहर व काँग्रेस कमिटी येथे ’महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना’या विषयावर त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद झाली. याप्रसंगी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी, आमदार कदम यांचे स्वागत केले. तसेच उपस्थितांच्या हस्ते,‘सन्मान महिलांचा...संकल्प काँग्रेिसचा’या फलकाचे अनावरण करण्यात आले. या फलकावर, विविध पदे भूषविलेेल्या कर्तबगार महिलांचे फोटो आहेत.
२०२३ मध्येच महिला आरक्षण कायदा मंजूर झाला आहे. काँग्रेससह इतर पक्षांनी त्याला पाठिंबा दिला होता. भाजपने २०२३ मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत का अंमलात आणले नाही.भाजपाला महिलांना आरक्षण द्यायचेच नाही. केवळ लोकांची व महिलांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रकार सुरू आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाला पोषक मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा त्यांचा डाव होता. ज्या राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे, तेथे मतदारसंघाच्या पुनर्रचनेखाली जादा खासदार निवडून आणून हुकूमशाही पद्धतीने काम करण्याचा त्यांचा घाट आहे. मतदारसंघाची पुनर्रचना करताना विरोधी पक्षाशी चर्चा करायला हवी होती.’
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचनेचा भाजपाचा डाव होता. याप्रकरणी भाजप तोंडघशी पडले आहे. आता लोकांची दिशाभूल करत आहेत. मोर्च काढत आहेत. भाजपचे दुटप्पी धोरण लोकांच्या समोर आणण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढील काळात रस्त्यावर उतरुन लढाई करेल. मतदारसंघ पुनर्रचना करताना कोणत्या राज्याला किती जागा वाढणार, कशा पद्धतीने होणार याविषयी कसलीही चर्चा नाही. खासदारांना विश्वासात घेणे नाही. ’
पत्रकार परिषदेला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी सुर्यकांत पाटील, बाळासाहेब सरनाईक, आनंद माने, हिंदुराव चौगले, सरला पाटील, भारती पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, बिद्री कारखान्याचे संचालक राहूल देसाई, जिल्हा परिषदेच्या सदस्या रेश्मा देसाई, नगरसेवक अमर समर्थ, संपतराव चव्हाण पाटील आदी उपस्थित होते.