कोल्हापूर जिल्हा परिषदेला ५७ कोटीचा गंडा घालण्याचा प्रयत्न ! प्रशासनाच्या सतर्कतेमुळे फसवणूक टळली
schedule25 Feb 25 person by visibility 873 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेची तब्बल ५७ कोटी चार लाख चाळीस हजार ७८६ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागाच्या सतर्कतेमुळे दुसऱ्या खात्यावर हस्तांतरित झालेली रक्कम पुन्हा जिल्हा परिषदेच्या खात्यावर वर्ग झाली. यामुळे मोठी आर्थिक फसवणूक टळली. दरम्यान जिल्हा परिषदेची आर्थिक फसवणुकीचा प्रकार घडल्यासंबंधी अज्ञाताविरोधात वित्त विभागातील लेखाधिकारी कृष्णात लक्ष्मण पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस तपास सुरू आहे.
१८ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जिल्हा परिषदेच्या बँक अकाऊंटवरुन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. फोकस इंटरनॅशलन, जीसीएसएसपी प्रायव्हेट लिमिटेडट ट्रिनिटी इंटरनॅशनल यांच्या बँक अकाऊंटवर पैसे पाठविण्यासाठी कोणीतरी जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकाऱ्यांच्या खात्याचा बनावट धनादेश, स्टॅम्प बनविला. त्या धनादेशावर खोटी स्वाक्षरी करुन धनादेश बँकेत भरला. बँकेत भरलेली रककम हस्तांतरित करुन जिल्हा परिषदेची तब्बल ५७ कोटी चार लाख ४० हजार ७८६ रुपये इतक्या रकमेचा परस्पर व्यवहार केला. १८ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत हा प्रकार झाला. १९ तारखेला शिवजयंतीची सुट्टी असल्यामुळे अज्ञाताने रक्कम हस्तांतरित करण्याचा प्रकार केला.
दरम्यान वित्त व लेखा विभागामुळे दर दिवसाआड जिल्हा परिषदेकडील बँक खाते उतारा तपासला जातो. २१ फेब्रुवारीचा खाते उतारा तपासला असता तीन बनावट धनादेशाद्वारे संबंधित रक्कम खर्ची पडल्याचे निदर्शनास आले. दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मूळ धनादेश वित्त विभागाकडे उपलब्ध असल्यामुळे संबंधित आर्थिक व्यवहार हा बनावट धनादेशाद्वारे झाल्याचे निदर्शनास आले.
‘या प्रकाराची गंभीर दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली. जिल्हा मध्यवर्ती बँकेला पत्र लिहून संबंधितांचे बँक खाते गोठवून सगळी रक्कम मूळ खात्यावर जमा करण्याविषयी कळविले. तसेच बनावट धनादेशाद्वारे पेमेंट झाले होते, त्याच्या छायांकित प्रती देखील बँकेकडून मागविल्या. त्याची तपासणी केली. त्यामध्ये उणिवा आढळल्या. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे व वेळीच केलेल्या कार्यवाहीमुळे संपूर्ण रक्कम जिल्हा परिषदेच्या बँक खात्यात प्राप्त झाली. संपूर्ण रक्कम सुरक्षित आहे.”अशी माहिती मुख्य वित्त व लेखाधिकारी अतुल आकुर्डे यांनी दिली आहे.