हसन मुश्रीफांना मत हीच गणपतराव फराकटेंना श्रद्धांजली-मनोज फराकटेंची भावनिक साद
schedule13 Nov 24 person by visibility 33 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याचे दिवंगत उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची पाठराखण आयुष्यभर केली. या विधानसभा निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांना मत हीच गणपतराव फराकटे यांना श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे यांनी केले.
कागल तालुक्यातील बोरवडे येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जाहीर प्रचार सभेत फराकटे बोलत होते. अध्यक्षस्थानी जोतिराम साठे होते. मनोज फराकटे पुढे म्हणाले, हसन मुश्रीफ आणि बोरवडे गावचे ऋणानुबंध घट्ट आहेत. त्यांच्या प्रत्येक निवडणूकीत सातत्याने बोरवडे गावाने आणि बिद्री बोरवली जिल्हा परिषद मतदार संघाने पाठराखण केली. आजपर्यंत जेवढे मताधिक्य मिळाले होते त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य बोरवडे गावातून मुश्रीफ यांना मिळेल.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पंचवीस वर्षांच्या काळात देशातील सर्वाधिक विकासनिधी कागल मतदारसंघात आणला. या काळात लोकांच्या भल्याचा विचार करुन त्यांच्या सुखदुःखात सामील झालो. एकीकडे समर्पित भावनेने काम करणारा माझ्यासारखा उमेदवार असताना दुसरीकडे चांगल्या योजनांना खो घालणारा आणि आडकाठी आणणारा कपटी उमेदवार आपल्यासमोर उभा आहे. मी लोकांच्या चुली पेटवून त्यांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करत असताना विरोधी उमेदवार मात्र गोरगरीबांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम करत आहे. जनतेने अशा बिनकामाच्या उमेदवारापेक्षा माझ्यासारख्या कामाच्या उमेदवाराला निवडून द्यावे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्ताजीराव घाटगे, अंबरीससिंह घाटगे, रघुनाथ कुंभार, आनंदराव साठे, प्रा. मधुकर पाटील, विजय काळे, बाळासाहेब फराकटे, यांनी मनोगते व्यक्त केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप माने, भूषण पाटील, आनंदराव साठे, आनंदराव फराकटे, डी. एम. चौगले, सुनीलराज सुर्यवंशी, जयदीप पोवार, साताप्पा साठे, तानाजी साठे, सुनील मगदूम, तानाजी जमणिक, अशोक फराकटे, बाळासाहेब फराकटे, के. के. फराकटे, ज्ञानदेव फराकटे, प्रदिप कांबळे, एकनाथ चव्हाण, कृष्णात फराकटे, उपसरपंच विनोद वारके, विनायक जगदाळे, सुनील घोडके उपस्थित होते. अशोक कांबळे यांनी स्वागत केले. उपसरपंच विनोद वारके यांनी आभार मानले.