जीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
schedule21 Oct 24 person by visibility 489 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य कर (जीएसटी ) अधिकारी निवास श्रीपती पाटील (रॉयल आस्टोनिया, न्यू पॅलेस मागे नागाळा पार्क) यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी ही कारवाई झाली. पाटील हे मूळचे पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील आहेत.
यासंबंधी माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदाराचे ऑइल व ग्रीस रिपॅकिंग करण्याची कंपनी आहे. राज्य कर अधिकारी पाटील यांनी तक्रारदाराला कंपनीची कागदपत्रे जीएसटी विभागाचे नियमाप्रमाणे आहेत का याबाबत नोटीस पाठवली होती. त्यानंतर अधिकारी पाटील यांनी कंपनीस भेट दिली. कंपनीचा बँकेचा अकाउंट नंबर जीएसटी पोर्टलला नोंदवला नाही म्हणुन तक्रारदार यांना दीड ते दोन लाख रुपये दंड होईल. दंड नको असेल पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
तक्रारदारांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खातरजमा केली. आणि कारवाई सुरू केली. राज्य कर अधिकारी पाटील हे तक्रारदारांकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.