वैद्यकीय कचरा उघडयावर, कारवाईचा डोस पन्नास हजाराचा
schedule06 Jul 24 person by visibility 297 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयामध्ये डी.एम.एन्टरप्राईझेस या कंपनीने उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकल्याने त्यांना महापालिकेने पन्नास हजार रुपयांचा दंड केला. शनिवारी सकाळी दहा वाजता महानगरपालिकेचे आरोग्य पथक छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय परिसरात स्वच्छतेबाबत पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी या पथकाला रुग्णालयाच्या आवारात जैव वैद्यकीय कचरा उघडयावर टाकल्याचे निदर्शनास आले. या रुग्णालयात डी.एम.एन्टरप्राईझेस या कंपनीमार्फत स्वच्छता व कचरा संकलन करण्यात येते. ही कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक मनोज लोट, ऋषीकेष सरनाईक, नंदकुमार पाटील व कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात आली. सीपीआरमध्ये साफसफाईचे काम रुग्णालयाने डी.एम.एन्टरप्राईझेस यांना दिले आहे. या ठिकाणी दैनंदिन होणारा कचरा महापालिकेच्यावतीने वेळोवेळी उठाव करण्यात येतो. महापालिकेने दंडात्मक कारवाई केल्यानंतर डी.एम.सर्विसेस यांनी या प्रकरणी त्यांच्या बेशिस्त व बेजबाबदार कर्मचाऱ्यांच्यावर शिस्तभंग कारवाई करत असल्याचे सांगितले आहे.