प्रशासनाला लोकप्रतिनिधींची अॅलर्जी आहे का ? भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांचा सवाल
schedule31 Aug 20 person by visibility 485 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापुरात कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यापासून प्रशासन सर्वच निर्णय एकतर्फी घेत आहे. त्यामुळे बर्याच वेळा आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी अशा प्रकारे परिस्थती निर्माण होते आहे. लोकप्रतिनिधी हे आपल्या प्रभागातील प्रत्येक गोष्टीशी जोडलेले असतात. त्यांना टाळून निर्णय घेणार्या प्रशासनाला लोकप्रतिनिधींची अॅलर्जी आहे का ? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे गटनेते अजित ठाणेकर यांनी केला आहे.
कोरोनाच्या कोल्हापुरातील वाढणाऱ्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधीही अहोरात्र कष्ट करत आहेत. त्यातून काही लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागणही झाली तर एक लोकप्रतिनिधी त्याला बळीही पडले आहेत. तरीही प्रभागापासून ते शहरापर्यंत कोणताही निर्णय घेताना प्रशासन लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही हे दुर्देवी आहे आणि शहराच्या दृष्टीने घातकही आहे. यामुळे बर्याच वेळा जी समस्या आहे त्या ऐवजी वेगळीच उपाययोजना प्रशासनाकडून होत आहे. याचाच परिपाक म्हणून कोल्हापुरात कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवणे अवघड होत आहे.
आता सार्वजनिक गणपती विसर्जनाबाबतही प्रशासनाने विचित्र भूमिका घेतली आहे. मूर्ती विसर्जन करण्याकरीता प्रशासन वाहन व्यवस्था करणार आहे असे दिसते. शहरातील स्थापन केलेल्या मुर्तींची संख्या व घरगुती गणपती विसर्जनावेळी आलेला वाहनांचा अनुभव पहाता या पध्दतीने शहरातील सर्व मूर्ती विसर्जीत होण्यास बराच कालावधी लागेल. त्यातून वादाचे प्रसंग उद्भवू शकतात याची प्रशासनाला जाणीव नाही का? तसेच इतक्या मोठ्या प्रमाणावर मूर्ती ताब्यात घेऊन विसर्जन करताना काही कमी जास्त झाल्यास त्याचा काय परीणाम होईल याचा प्रशासनाने विचार केला आहे का?