जिप सोसायटीतर्फे शनिवारी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
schedule30 Oct 23 person by visibility 208 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीतर्फे शनिवारी (चार नोव्हेंबर २०२३) सभासदांच्या गुणवंत मुला-मुलींचा गौरव व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात येणार आहे. जिप सोसायटीच्या श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे सकाळी ११.३० वाजता हा समारंभ होत आहे अशी माहिती चेअरमन रणजित पाटील, व्हाईस चेअरमन मुजम्मिल अहमद नावळेकर व व्यवस्थापक व्ही. एन. बोरगे यांनी दिली आहे.
संस्थेतर्फे २०२३ या वर्षामध्ये जवाहर नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल, इयत्ता पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षासह क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या सभासदांच्या मुलांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या सभासदांचा व वर्ग एक-दोनची पदोन्नती मिळालेल्या सभासदांचा सत्कार आयोजित केला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्या हस्ते सत्काराचे आयोजन आहे. याप्रसंगी प्रा. युवराज पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी, सोसायटीचे संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ होणार आहे. या समारंभासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सोसायटीने केले आहे.