सत्यजित कदमांनी शहरात पायाभूत सुविधांचे जाळे विणले-खासदार धनंजय महाडिक
schedule06 Oct 24 person by visibility 108 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्यांनी विकासाच्या नावाखाली कोल्हापूरच्या नागरिकांची केवळ दिशाभूल केली. मात्र सत्यजीत कदम यांनी गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा नियोजन समिती तसेच विविध निधीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभाग आणि गल्लींमध्ये पायाभूत सुविधांचे जाळे विणण्याचा प्रयत्न केला आहे. असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले.
जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजीत कदम यांच्या प्रयत्नातून आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून रूईकर कॉलनीतील महाडिक वसाहतीमधील मैदान विकसीत करण्यात आले आहे. त्यासाठी १ कोटी १० लाख रूपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या मैदानाचे लोकार्पण झाले. माजी नगरसेवक राजसिंह शेळके, विजय सुर्यवंशी, सीमा कदम, उमा इंगळे, आशिष ढवळे, वैभव माने, स्मिता माने यांच्या उपस्थितीत झाले.
खासदार महाडिक म्हणाले, ‘कोल्हापूर शहरामध्ये प्राथमिक सेवा सुविधांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी आणि विकासाचे नवनवीन प्रकल्प राबवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत सत्यजीत कदम यांच्या पाठीशी नागरिकांनी रहावे.’
यावेळी सत्यजीत कदम यांनी, या परिसरात झालेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. त्यामध्ये या मैदानाभोवती संरक्षक जाळी मारणे, वॉकींग ट्रॅक तयार करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करणे आणि मैदान सपाटीकरण यासारख्या कामांचा समावेश असल्याचे कदम यांनी सांगितले. दरम्यान परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मनोगत व्यक्त करताना, सत्यजीत कदम यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक केले आणि येत्या विधानसभा निवडणूकीत प्रभागातील नागरीक हे कदम यांच्या पाठीशी ठामपणेे राहतील, अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमावेळी महावीर गाठ, रूईकर कॉलनी सोसायटीचे अध्यक्ष विजय रोहिडा, प्रशांत घोडके, नितीन पाटील, विजयेंद्र माने उपस्थित होते.