इलेक्शन आले डोक्यावरी, सुरु करा गाजराची शेती! काव्यांगणात शब्दांचे निखारे !!
schedule06 Oct 24 person by visibility 568 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तरुणाईच्या मनाला भिडणाऱ्या रचना, प्रेमाच्या नानाविध रंगाची उधळण करणाऱ्या शब्दबोली, सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या आणि सध्याच्या राजकीय, आर्थिक स्थितीवर नेमकेपणाने व्यक्त होताना शब्दांचे निखारे फुलविणाऱ्या कविता…‘काव्यांगण २०२४’हे मधील चित्र. शनिवारी, पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात निमंत्रित कवींचे कविसंमेलन फुलले. जवळपास तीन तासाहून अधिक काळ रंगलेल्या या काव्यांगणात रसिक हरपून गेले. कवींनी सादर केलेल्या प्रेमाच्या, सामाजिक संदर्भाच्या कवितेसह ‘इलेक्शन डोक्यावरी, सुरू करा गाजराची शेती’ यासारख्या काव्यपंक्तीतून सध्यस्थितीवर भाष्यही केले. या निमित्ताने भाषा भवन येथील वि. स. खांडेकर सभागृहाने वेगळी अनुभूती घेतली.
राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारकार्यांनी काही तरुण प्रभावित होतात. लोकराजा ऊर्जा मित्र परिवाराची स्थापना करतात. या परिवाराच्या माध्यमातून काव्यांगण २०२४ चे आयोजन केले होते. डॉ. माया पंडित-नारकर यांच्या हस्ते आणि साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांच्या अध्यक्षतेखाली काव्यांगणाचा उद्घाटनाचा औपचारिक कार्यक्रम पार पडला. विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, उद्योजक विजय आवळेकर, सचिन पानारी, डॉ. प्रविण कोडोलीकर, सचिन सुर्यवंशी, प्रमोद कसबले, सतिश पानारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या साऱ्यांनी लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन सोहळयासाठी उपस्थिती दर्शविलेले इचलकरंजी येथील पोलिस उपअधीक्षक समीर साळवे यांनी ‘कणाकणांनी क्षणांक्षणांनी बहरत जा तू नव्या चेतना, नव्या उमेदी रुजवत जा तू’ही कविता सादर करत काव्यांगण मैफलीला सुरुवात केली. यानंतर निमंत्रित कवींनी व्यासपीठाचा ताबा घेतला आणि कविता ही हृदयाची भाषा असते. ती प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग असते. नात्यांमध्ये भावनांची अत्तर असते याची प्रचिती उपस्थितांना आली.
तुझ्या नाजूक हातात सखे चुडाही नाजूक….
निवेदक व कवी रोहित शिंगे यांनी, ‘शब्दा-शब्दांचे झोके देऊन कवी घडवत राहतो काळाला’ अशा शब्दांत कवी आणि कवितांचे महत्व पटवून दिले. यानंतर अंबेजोगाईचा कवी अविनाश भारती यांनी प्रेमावर आधारित चुडा कविता सादर केली. त्यांनी म्हटलेल्या ‘तुझ्या नाजूक हातात सखे चुडाही नाजूक, माझी नजर भावूक त्याला सारेच ठावूक !’या कवितेने तरुण मनाच्या तारा छेडल्या. तरुणाईच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या बहारदार कविता उत्तरोत्तर सादर झाल्या. मोहोळ येथील नितीन जाधव यांची ‘आईचा जन्म’ साऱ्यांच्या मनाला स्पर्शून गेली.
मुंबईच्या यामिनी जाधव यांनी शेर, गझल आणि कवितेतून सभागृहात प्रेमाचा माहोल तयार केला. त्यांच्या, ‘सुखाला आज माहेरी पुन्हा परतायला सांगू-ऋतू गायला सांगू तिलाही यायला सांगू !’ या साद घालणाऱ्या कवितेला तरुण वर्गाने डोक्यावर घेतला. “कुठे काही विसरले, जर मला भेटून जाताना -लगोलग हात माझा धर मला भेटून जाताना
कशाला एवढी घाई -चुकव ट्रेन एखादी, जरा रेंगाळ ओठावर-मला भेटून जाताना !!’’ त्यांच्या या कवितेला प्रचंड दाद मिळाली.
एका पाखराच्या नावे माझं काळीज केलय….
चिंचवाड येथील उमेश सुतार यांची ‘प्रेम म्हणजे कोणासाठी फुलापानांची दरवळ असते, प्रेम म्हणजे कोणासाठी ओली ओली हिरवळ असते’ प्रेमाचा अनोखा स्पर्श देऊन गेली. इचलकरंजीचा रोहित शिंगे यांनी प्रेमिकांची अवस्था शब्दबद्ध केली. ‘लई दिसाचं सपान कसं कुशीत आलय, एका पाखराच्या नावे माझं काळीज केलय’ या कवितेला सभागृहांनी टाळयांच्या गजरात दाद दिली. राधानगरीतील विश्वास पाटील यांनी वर्तमान इतिहासात असता तर या सामाजिक आशयाची कविता सादर केली. सध्याच्या घडामोडीवर आधारित या कवितेने रसिकमनाला अंतर्मुख बनविले. विशाल पाटील यांनी प्रास्ताविक केले. विजय चौगले, प्रदीप बोभाटे, राजेश पाटील यांनी निवेदन केले. युवराज पाटील यांनी आभार मानले.
…………………………
सभागृहाने उभे राहून दिली कवीला दाद
नांदेड येथील नारायण पुरी यांच्या ‘प्रेमाचा झांगडगुत्ता गं’या कवितेने काव्यांगणच्या मैफलीला वेगळया उंचीवर नेले. देशातील सध्य स्थिती, जातीधर्माचे राजकारण, सत्तेसाठी पक्ष फोडाफोडी, विविध योजनांचा भडिमार यावर अतिशय खुमासदारपणे भाष्य करणाऱ्या रचना सादर करत पुरी यांना उपस्थितांना हसविले, सोबतीला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले. प्रियकर आणि प्रेयसीच्या संवादातून फुलणाऱ्या ‘प्रेमाचा झांगडगुत्ता गं’ या कवितेत कवी पुरी यांनी ‘मी पानसरे, मी दाभोळकर -तू स्वातंत्र्यांचा नुसता बोभाटा गं !’अशी मांडणी केली. तेव्हा उपस्थित सभागृहाने उभे राहून त्यांच्या कवितेला दाद दिली. या कवितेने सभागृहाचा नूर पालटला.