करवीरनिवासिनी देवीची पूजा सिंहासनाधिष्ठीत अंबाबाई रुपात
schedule03 Oct 24 person by visibility 174 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (३ ऑक्टोबर ) सुरुवात झाली. घटस्थापना करुन यंदाच्या उत्सवाला प्रारंभ झाला. घटस्थापनेच्या दिनी करवीरनिवासिनी अंबाबाई देवीची बैठी रुपात पूजा बांधली जाते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी करवीरनिवासिनीची सिंहासनाधिष्ठित अंबाबाई रुपात पूजा बांधली आहे. श्रीसुक्तामध्ये वर्णन केल्याप्रमाणे देवीची बैठी स्वरुपात पूजा आहे. लक्ष्मी रुपात सजलेली आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याने मंदिर फुलले आहे.
घटस्थापनेनिमि्त्त मंदिरात कार्यक्रमांची एकच लगबग होती. पहाटे काकड आरती झाली. देवीवर अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पुजाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना झाली. याप्रसंगी तोफेची सलामी देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे व मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाली.
दुपारी साडेबारा वाजता आरती झाली. यानंतर नवरात्र उत्सवानिमित्त पूजा बांधण्यास सुरुवात झाली. अंबाबाई ही आदिजननी. करवीर निवासिनी अशीच पद्मासनस्था म्हणजे कमलावरती मांडी घालून बसलेली आहे. अष्ट दिग्गज तिला अभिषेक घालत आहेत. म्हणून तिला अभिषेक लक्ष्मी असे सुद्धा म्हटले जाते. तिच्या दोन्ही अंकावर अर्थात मांडीवर दोन बाळं खेळत आहेत वरच्या दोन हातांमध्ये कलश आणि शंख धारण करणाऱ्या जगदंबेने वरद अभय मुद्रेने सर्वांना आश्वस्त केले आहे तिच्यासमोर योगी पुरुष सामान्य जन नमस्कार मुद्रेमध्ये उभे आहेत विविध प्रकारच्या मौल्यवान धातूंमध्ये रत्नांमध्ये घडवली गेलेली मेरू यंत्रे तिच्यासमोर पुजली गेली आहेत गोधन अर्थात पशूधन ,वेगवेगळ्या प्रकारच्या शाकभाज्या धान्यं फळं अशी सर्व प्रकारची लक्ष्मी आज करवीर निवासिनीच्या गाभाऱ्यामध्ये विराजमान आहे. आदिशक्तीच्या अंशापासून प्रगट झालेली ही लक्ष्मी असे पूजेचे स्वरुप आहे.