रोजगार हमी योजनेतून जतवासियांना लखपती करण्यासाठी प्रभावीपणे कामे करा-मंत्री भरत गोगावले
schedule13 Feb 25 person by visibility 202 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून अधिकाधिक प्रकल्प राबवू. जतला सुजलाम सुफलाम करण्यासाठी व जतवासियांना लखपती करण्यासाठी अधिकारी व नागरिकांनी रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे प्रभावीपणे राबवावीत. त्यासाठी वेगवेगळ्या खात्याअंतर्गत अधिकाधिक आवश्यक निधी देऊ. तसेच जागतिक बँकेकडून भविष्यात मित्रा संस्थेला मिळणाऱ्या निधीतील अधिकाधिक निधी जतच्या विकासासाठी देणार असल्याची ग्वाही रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांनी दिली.
जत येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) सहाय्याने हरित महाराष्ट्र व सुविधा संपन्न कुटुंब कार्यक्रमाची अंमलबजावणी व याकरिता करावयाच्या उपाययोजना याबाबत सरपंच मेळाव्याचे आयोजन केले होते. तहसील कार्यालय प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, मिशन मनरेगाचे महासंचालक श्री. नंदकुमार, जिल्हाधिकारी अशोक काकडे, उपवनसंरक्षक नीता कट्टे, मनरेगाचे राज्य गुण नियंत्रक राजेंद्र शहाडे, उपजिल्हाधिकारी (दीपक शिंदे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे आदि उपस्थित होते.
आमदार गोपिचंद पडळकर म्हणाले, ‘दुष्काळी जिल्ह्यांच्या विकासासाठी राज्य शासनाने जलसंधारण कामांसाठी भरीव निधी दिला आहे. जत तालुक्यात गट तट बाजूला ठेवून रोजगार हमी योजनेची कामे यशस्वी करा. तालुक्यातील प्रत्येक माणूस रोजगार हमी योजनेतून लखपती व्हावा. अधिकाऱ्यांनीही त्यासाठी सहकार्य करून योजना यशस्वी करावी.’ गटविकास अधिकारी आनंदा लोकरे यांनी प्रास्ताविक केले. वैष्णवी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी तालुक्यातील विकासात्मक कामाबाबत चित्रफीत दाखवण्यात आली. प्राणवायू रथाचे उद्घाटन झाले. या बसमध्ये बांबू लागवड वस्तू व स्क्रीन आहे. त्यातून बांबू लागवडीची माहिती दिली जाणार आहे. सरपंच संघटना व रोजगार सेवक संघटनेच्या माध्यमातून मंत्री भरत गोगावले यांचा सत्कार करण्यात आला.