आम्ही कसले कॉमेडियन, खरे कलाकार तर राजकारणी ! नेते-अभिनेत्यांचा रंगतदार संवाद !!
schedule05 Oct 25 person by visibility 252 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नेते आणि अभिनेते एका व्यासपीठावर जमले आणि हास्य -विनोदाची जणू मैफलच रंगली. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री उदय सामंत आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय जुगलबंदी पाहून अभिनेते अशोक सराफ म्हणाले, ‘आम्ही कसले कॉमेडियन, ही राजकीय टोलेबाजी अन् लढाई तर फारच इंटरेस्टिंग आहे. माझ्यापेक्षा जबरदस्त विनोद राजकीय मंडळींना सुचतात’अशी मिश्किल टिप्पणी करताच उपस्थित प्रेक्षकांची हसता हसता पुरेवाट झाली.
निमित्त होतं, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेतर्फे अभिनेता अशोक सराफ यांच्या सत्काराचे. अभिेनेते सराफ यांना संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती गौरव पुरस्करांनी सन्मानित केलेि. रोख ५१ हजार रुपये, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थिती दर्शवित कलाकार आणि कला क्षेत्रावरील प्रेमाची प्रचिती घडविली. या कार्यक्रमात अभिनेता अशोक सराफ व निवेदिता सराफ यांची विघ्नेश जोशी यांनी प्रकट मुलाखत घेतली.
कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांच्याकडे पाहत,‘मी भोळाभाबडा माणूस आहे. खळखळून हसतो. हसणाऱ्या माणसाच्या पोटात काही राहत नाही, टेन्शन निघून जात असं म्हणतात.’असे म्हटले. त्यावर आमदार पाटील यांनी मुश्रीफ यांना उद्देशून, आता आपण ‘भोळाभाबडा’सिनेमा काढू’असे सांगितले. त्यावर मंत्री सामंत यांनी राजकीय कोटी केली. ते म्हणाले, ‘ अभिनेते अशोक सराफ हे अभिनयातील कलाकार आहेत, मी राजकारणातील कलाकार आहे. सिनेमा-नाटकातील कलाकारांना तीन तासासाठी मेकअप करावा लागतो. आम्हाला मात्र दिवसभर मेकअप ठेवावा लागतो. शिवाय आमच्यातही काही कलाकार असे आहेत की जे कधीच मेकअप काढत नाहीत.’असा टोला लगाविला. व्यासपीठावरील मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांच्याकडे पाहत, ‘कोल्हापुरात विरोधक कोण ? सत्ताधारी कोण ? हेच कळत नाही. कारण येथे सगळयांचे आपआपसात ठरतं. ते, ‘आमचं ठरलंय’असे असते.’ असे म्हणताच उपस्थितांनी टाळयांचा गजर करत त्यांच्या विधानाला दाद दिली.
कार्यक्रमात अभिनेते अशोक सराफ यांच्या मनोगताकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. राजकीय नेत्यांची टोलेबाजी, कलाप्रेमींनी केलेली गर्दी, हृदय सत्कार सोहळा या साऱ्या पार्श्वभूमीवर सराफ काय बोलणार ? याविषयी प्रेक्षकांत उत्कंठा वाढली होती.भाषणाला उभे राहताच सराफ यांनी एकवार सभागृह व एकदा व्यासपीठाकडील राजकीय मंडळीकडे पाहत, ‘आम्ही कसले कॉमेडियन, माझ्यापेक्षा जबरदस्त विनोद या राजकीय मंडळींना सुचतात. त्यांच्यातील लढाई फारच इंटरेस्टिंग होती.’असे त्यांच्या विनोदी शैलीत म्हणताच सभागृहात हास्याच्या कारंज्या पिकल्या. नाट्य परिषद कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह गिरीश महाजन यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष जितेंद्र देशपांडे यांनी मानपत्राचे वाचन केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अभिनेते मोहन जोशी, हेमसुवर्णा मिरजकर, संजय पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूरचे ऋण मोठे…
अभिनेता सराफ म्हणाले, ‘कोल्हापूर ही माझी कर्मभूमी आहे. या शहरात मी खूप काही शिकलो. माझ्या कलाकार म्हणून जडणघडणीत कोल्हापूरचे ऋण मोठे आहेत. ते आयुष्यभर विसरता येणार नाहीत. कोल्हापुरातील हा सत्कार माझ्यासाठी खास आहे. कारण हा सत्कार घरच्या माणसांनी केला आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या नावांनी हा पुरस्कार मला मिळाला आहे. सरकारने मला ‘महाराष्ट्र भूषण, पदमश्री’असे पुरस्कार देऊन सन्मानित केले. आजवर अनेक पुरस्कार मिळाले. त्या पुरस्काराचे समाधान मोठे आहे. मात्र संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या नावाचा हा पुरस्कार देऊन कलापूरने मला आणखी मोठं केले.’