विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजनची साडेतीन तास बैठक, ५९८ कोटीच्या खर्चाला मान्यता
schedule06 Jul 24 person by visibility 352 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात शंभर टक्के निधी खर्च होण्यासाठी चोख नियोजन करा, तसेच आवश्यक त्या प्रशासकिय मान्यता लवकरात लवकर द्या, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. यावेळी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मार्च २०२४ अखेर ५९८ कोटी ६७ लाखाच्या झालेल्या खर्चाला समितीने मान्यता दिली. तसेच सन २०२४-२५ साठी अर्थसंकल्पित ६९५ कोटी ६७ लाख रुपयांपैकी प्राप्त २२९ कोटी ४२ लाख रुपयांच्या तरतुदीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साडेतीन तास ही बैठक चालली. विविध सूचना करण्यात आल्या.
कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात घेण्यात आली. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबीटकर, आमदार सर्वश्री जयंत आसगावकर, जयश्री जाधव, प्रकाश आवाडे, राजूबाबा आवळे, राजेश पाटील, ऋतुराज पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते.
जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचे काम रद्द करावे, असा ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, “जिल्ह्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शाळांच्या इमारतींचे बांधकाम, येथील स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्याबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही जलद गतीने करा. वृद्ध कलावंतांना मानधन देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करा, परिख पुलाखाली पावसाचे पाणी साचू नये यासाठी नुतनीकरणाची कार्यवाही जलद करा.”
खासदार धैर्यशील माने यांनी जिल्ह्यात वनविभागातून जाणाऱ्या रस्त्यांची दुरूस्ती व्हावी, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल व्हावा, असे सांगितले.जुन्या शाळांची प्राधान्याने दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा आमदार प्रकाश आबीटकर यांनी व्यक्त केली. रंकाळा तलाव प्रदुषण मुक्त होण्यासठी प्रयत्न व्हावेत, असे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले. महानगरपालिकेच्यावतीने सीबीएससी अभ्यासक्रमावर आधारीत शाळा व्हावी, अशी अपेक्षा आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी सांगितले की जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यात शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात येईल.