रानभाजी महोत्सवला जोरदार प्रतिसाद, दिवसभरात एक लाखाहून अधिक उलाढाल
schedule09 Sep 26 person by visibility 42 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानतर्फे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व गणपती महोत्सवाचे आयोजन बुधवारी ( ९ सप्टेंबर २०२६) जिल्हा परिषद कोल्हापूरच्या प्रांगणात करण्यात आले. दिवसभर आयोजित या महोत्सवाला जोरदार प्रतिसाद मिळाला. महोत्सवामध्ये एकूण ७२ स्वयंसहायता समूहांमधील १५० महिलांनी सहभाग नोंदविला.या समूहाकडील विविध वस्तू, खाद्यपदार्थ मिळून दिवसभरात एक लाख पंधरा हजार ७२० रुपयांच्या विक्री झाली.
या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा शशिकांत खोत यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, बांधकाम समिती सभापती सारिका यशवंत नांदेकर, जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती शिल्पा प्रवीण यादव, जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे, कागल पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विभागीय आयुक्त शितल उगले यांनी महोत्सवास भेट देऊन महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंची पाहणी केली.
या एकदिवसीय महोत्सवामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या रानभाज्या, गणपती सजावटीच्या आकर्षक वस्तू तसेच विविध उपयुक्त साहित्याचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. ग्रामीण महिलांच्या कौशल्याला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, स्थानिक व पारंपरिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि महिलांच्या उत्पन्नवाढीस चालना देणे हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश होता.
टाकळा, अळू, मायाळू, तांदुळजा, घोळ, करडई, शेवगा पाने, आघाडा, चाकवत, माठ, कुर्डू, अंबाडी, हादगा, केना, कुरडूची भाजी, सुरणाची पाने/कंद, काटेमाठ, लाल माठ, तरवड, शेवाळ, तेरडा, चिचुर्डी, पाथरी, तांदुळजाची भाजी, खापरफुटी, कोरफड, रानभेंडी, बांबू कोंब, भोपळी, तोंदली, रानकारली या रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ मिळण्यासोबतच त्यांच्या उद्योजकतेला आणि आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली.या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. जास्मिन मुख्यकार्यकारी अधिकारी व अतिरिकत मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.