तत्कालिन सहायक निबंधक सुजय कदम यांची चौकशी होणार, अपर निबंधकांनी दिले आदेश
schedule22 Apr 26 person by visibility 90 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बदलीचा आदेश होऊन कार्यमुक्त केल्यानंतरही तत्कालिन सहायक निबंधक सुजय संभाजी कदम यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यालय उघडले होते. तसेच कामकाज केल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेत सहकारी संस्थेचे अपर निबंधक राजेश सुरवसे यांनी विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांना कदम यांची चौकशी करुन वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
गोकुळ दूध संघाशी संलग्न तब्बल १२०० प्राथमिक दूध संस्थांच्या पात्रतेसंबंधी सहायक निबंधक दुग्ध विभाग यांच्याकडे सुनावणी सुरू आहेत. दरम्यान तत्कालिन सहायक निबंधक सुजय कदम हे पदावर काम करत असताना चंदगडचे आमदार शिवाजी पाटील व गर्जन संघटनेचे प्रकाश बेलवाडे यांनी त्यांच्या कामकाजाविषयी तक्रारी केल्या होत्या. सोळा एप्रिल रोजी कदम यांची अचानक बदली करण्यात आली. त्यांची शाहूवाडी येथील सहकारी संस्थेचे सहायक निबंधकपदी बदली करण्यात आली. तर शाहूवाडी येथील सहायक निबंधक कृष्णा सखाराम ठाकरे यांची कोल्हापुरातील सहायक निबंधक पदावर बदली झाली. कदम यांच्या बदलीच्या आदेशाच्या दिनांकापासून कार्यमुक्त केल्यानंतरही त्यांनी रात्री सहायक निबंधक कार्यालय कोल्हापूर येथे रात्री उशिरापर्यत कामकाज करत होते. त्यांनी कार्यालय कशासाठी उघडले, कोणकोणते कामकाज केले यासंबंधीची चौकशी करुन वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा असे आदेश सहकारी संस्थेचे अपर निबंधक राजेश सुरवसे यांनी विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांना दिले आहेत.